नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गाडी अत्यंत सुस्थितीत आहे मात्र गाडी नवीन घेऊन वीस वर्षे किंवा जास्त वर्षे झालेली आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने निर्धारित केलेली वर्षे संपली आहेत. गाडी आता चालविता येणार नाही. नवीन गाडी खरेदी करायला पैसेही नाहीत. आता काय करायचे, ही चिंता अनेकजणांना सतावत असेल. मात्र आता चिंता करण्याची आवशक्यता नाही. केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने २० वर्षे जुनी कार आणि मोटरसायकल रस्त्यावर चालवण्याची परवानगी मिळणार आहे; पण यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. नोंदणीचे नुतनीकरण करावे लागेल. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे जुनी वाहने वापरणाऱ्या लाखो वाहनमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नोंदणीचे नूतनीकरण : २० वर्षे पूर्ण केलेल्या वाहनांसाठी नोंदणीचे नूतनीकरण करणे बंधनकारक असेल. यासाठी वाहनमालकांना नेहमीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागेल.
अनिवार्य ‘फिटनेस टेस्ट’: नूतनीकरण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीची ‘फिटनेस टेस्ट’. या तपासणीत गाडीचे इंजिन, ब्रेक, लाईट, टायर यांची कार्यक्षमता तपासली जाईल. तसेच, गाडीचे प्रदूषण उत्सर्जन (PUC) ठरावीक निकषांमध्ये आहे का, हे काटेकोरपणे पाहिले जाईल. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यासच गाडी रस्त्यावर चालवता येईल.
नियमाचा उद्देश
सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश दुहेरी आहे. एकीकडे प्रदूषण नियंत्रणात आणणे आणि दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणे. वाहन जुने झाल्यावर अपघाताचा धोका आणि दुरुस्तीचा खर्च वाढतो. त्यामुळे नियमित तपासण्या करून गाडी योग्य स्थितीत आहे, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
नवीन नियम लागू झाल्यानंतर, वाहनमालकांनी आपल्या गाडीची नोंदणी वेळेत नूतनीकरण करणे आणि आवश्यक ती शुल्के भरणे बंधनकारक असेल. वेळेत नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. लवकरच सरकारकडून या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील, अशी अपेक्षा आहे.
वीस वर्षे जुने वाहन नोंदणी शुल्क असे
अवैध वाहनांसाठी नोंदणी शुल्क : १०० रुपये.
मोटर सायकल : २ हजार रुपये
तीन चाकी किंवा ४ चाकी : ५ हजार रुपये
हलक्या मोटर वाहनांसाठी : १० हजार रुपये
आयात केलेल्या दुचाकींसाठी : २० हजार रुपये
आयात केलेल्या चार चाकी वाहनांसाठी : ८० हजार रुपये
इतर श्रेणीतील वाहनांसाठी : १२ हजार रुपये



