कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
कोल्हापुरला लय मोठा इतिहास आहे. त्यो अजून आपल्याबी माहिती नाही. त्येच्या विषयी संशोधन चालूच असतंय. आता १८५८ मधला आपला इतिहास एका ब्रिटीश अधिकाऱ्याने चित्रांच्या माध्यमातून रेखाटून ठेवल्याची माहिती समोर आलीया. कोल्हापुरातल्या जुन्या वास्तूंच्या काही चित्रांचा ऐवज हाती लागलाय. वॉडबाय नावाचा अधिकारी त्यावेळी काही महिने कोल्हापुरात राहिला होता. त्यानं काही चित्रं काढल्यात आता त्या चित्रांतील वास्तू नामशेष झाल्या आहेत. मात्र, त्या निमित्ताने आपल्या कोल्हापूरचा इतिहास डोळ्यांसमोर चमकल्या शिवाय राहत नाही.
मेजर सिडने जेम्स वॉडबाय या १८४० ला जन्मलेला ब्रिटीश १८५८ ला सैन्यात अधिकारी झाला आणि लेफ्टनंट वॉडबाय म्हणून १९ बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री या रेजिमेंटमध्ये त्याची नेमणूक झाली. भारतात आल्यावर त्याला बेळगाव, धारवाड या भागात पाठवण्यात आलं. तिथून साधारपणे १८५८ च्या डिसेंबर महिन्यांत तो कोल्हापुरात आला. जवळपास सहाच महिने कोल्हापुरात राहिला. मात्र, आपल्यासाठी फार महत्वाचं काम करून ठेवलंय. ते म्हणजे त्यानं कोल्हापूरची काही चित्रं काढून ठेवलेली आहेत. आणि त्यानं काढलेल्या चित्रातल्या जवळपास सगळ्या वास्तू या आता नामशेष झालेल्या आहेत किंवा विस्मृतीत गेलेल्या आहेत. कोल्हापुरच्या इतिहासाला या चित्रांच्या निमित्ताने उजाळा देता येणार आहे.
मेजर सिडने जेम्स वॉडबाय नावाचा ब्रिटिश अधिकारी अफगाण युद्धात अफाट शौर्य दाखवत लढला आणि तिथं त्याला वीरमरण प्राप्त झालं. मुंबईत पूर्वी बॉम्बे जिमखाना ते व्हिक्टोरिया टर्मिनस या रस्त्याला त्याच्या स्मरणार्थ त्याचं नाव देण्यात आलं होतं.
……………….
करवीर किल्ला बहु रंगेल, हाय पंचगंगेच्या तीरी
महातीर्थांची महिमा सांगतो गाजती तिर्थ भारी
असा शाहीर सुलतानजी पाटील यांनी रचलेल्या कंपूचा पोवाड्यात कोल्हापूरच्या कोटाचा उल्लेख आलेला आहे. एकेकाळी कोल्हापूर शहराला तटबंदी होती आणि तटबंदीच्या आत वसलेल्या शहराला कोट कोल्हापूर म्हणत तर ब्रिटिश त्यालाच कोल्हापूर फोर्ट म्हणून संबोधत असत. कोल्हापूरच्या तटबंदीला ६ वेशी म्हणजे दरवाजे होते. त्यापैकीचा एकच दरवाजा आज बिंदू चौकात शिल्लक आहे त्याला एकेकाळी रविवार वेस म्हणून ओळखले जाई. कोल्हापूरची वाढ व्हावी म्हणून १८८० च्या दशकात ही तटबंदी उतरवण्यात आली आणि त्याच्याबरोबर हे दरवाजेही नाहीसे झाले.
कोल्हापूरच्या वेशीचे हे दरवाजे कसे होते याबद्दलचा एकही संदर्भ आजवर उपलब्ध नव्हता पण वॉडबायने काढलेल्या चित्रातून आता कोल्हापूरचा शुक्रवार दरवाजा कसा होता हे आता आपल्याला बघता येणार आहे. कोल्हापूरची शुक्रवार वेस ही महत्वाची वेस होती कारण उत्तरेकडून येताना ही वेस ओलांडूनच शहरात प्रवेश करावा लागत असे. १७७८ साली झालेल्या महादजी शिंदे यांच्या कोल्हापूर स्वारीच्या वेळीही महादजी शिंदेंनी शुक्रवार वेशीच्या बाहेरून मोर्चे बांधून तिकडून वेशीवर तोफांचा मारा केला असे उल्लेख सापडतात. त्याचबरोबर पटवर्धन आणि छत्रपती यांच्यातील लढाईचे वर्णन करणाऱ्या कंपूच्या पोवाड्यातसुद्धा शुक्रवार वेशीपाशी झालेल्या हातघाईचा उल्लेख आहे.
कोल्हापूरमध्ये येण्याचा जुना मार्ग हा पन्हाळ्याच्या बाजूने होता, १८६६ नंतर पुणे कोल्हापूर हा आजचा रस्ता तयार झाला आणि तिकडून वाहतूक सुरू झाली. पन्हाळ्याकडून कोल्हापुरात येताना कोल्हापूरच्या बाहेरच्या भागात एक प्रवासी बंगला (ट्रॅव्हलर्स बंगलो) होता तो बंगला आणि त्याच्यामागून दिसणारा पन्हाळगडही वॉडबायने चितारलेला आहे. हा बंगला कोणता याचा शोध घेताना तो बंगला म्हणजे आजचा सोनतळीतील स्काऊट बंगला. राजर्षी शाहू महाराजांचेही बराच काळ या बंगल्यात वास्तव्य होते.
करवीर छत्रपतींची जुन्या राजवाड्याशिवायही खासबागेतला वाडा, रविवारातला वाडा अशी काही निवासस्थाने कोल्हापुरात होती असाच एक वाडा हा पद्माळा तलावापाशी होता तो आता अस्तित्वात नसला तरी वॉडबायने काढलेल्या चित्रामुळे त्याचे अस्तित्व आपल्याला समजते. वॉडबायने काढलेल्या चित्राखाली त्याने हा वाडा पद्माळा तलावाच्या पूर्वेला आहे अशी नोंद केलेली आहे. त्यानुसार हा वाडा आजच्या शाहू दयानंद शाळेच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
जुन्या राजवाड्यापासून सरळ रेषेत नवीन राजवाड्याकडे जाणारा रस्ता म्हणजे भाऊसिंगजी रस्ता. नगारखान्यापासून हा रस्ता सुरू होतो. एकेकाळी अगदी छोटी असणारा हा रस्ता, त्यावरची टुमदार घरेही वॉडबायने रेखाटलेली आहेत.
यात राहुल माळी, भारत पांडुरंग महारुगडे आणि यशोधन जोशी यांनी काय केलं?
वॉडबाय यांची काही चित्रे ऑस्ट्रेलियातील संग्रहालयात आहेत याबद्दल माहिती समजली. या चित्रांसंदर्भात हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून संग्रहालयाशी संपर्क साधून ती चित्रे मिळवायचे प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान, वॉडबायच्या वंशजांचाही शोध घेतला आणि त्यांच्या तसेच संग्रहालयाच्या मदतीने ही चित्रे मिळवण्यात यश आले. आजवर अज्ञात असणारा कोल्हापूरच्या इतिहासाचा हा ठेवा समोर आणणे हा ‘हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर’ चा पहिलाच प्रकल्प होता आणि त्यात यश आले याचा मनापासून आनंद आहे. कारण, संस्थेचा मूळ उद्देशच कोल्हापूरचा अज्ञात इतिहास उजेडात आणणे हा आहे.
चित्रे…..
१ . कोल्हापूरची शुक्रवार वेस (चित्रावर जुम्मा गेट असं लिहिलेलं आहे)………..
————————————————————————————-
२. ट्रॅव्हलर्स बंगलो अर्थात सोनतळीचा बंगला…..
————————————————————————————-
३. करवीर छत्रपतींचा पद्माळा तलावाजवळचा बंगला
———————————————————————————-
४ . जुन्या राजवाड्याचा नगारखाना आणि तिथून निघणारा रस्ता (तेंव्हा त्या रस्त्याला काय नाव होतं याचे संदर्भ सापडत नाहीत)
———————————————————————————————
ता.क. – जुन्या वळणाचे इंग्रजी हस्ताक्षर वाचण्याची आवड असेल तर प्रत्येक चित्राखाली दिलेली त्या ठिकाणाबद्दलची थोडक्यात माहिती आणि चित्र काढल्याची तारीख वाचण्याचा नक्की प्रयत्न करा.
यशोधन जोशी
९८२३४५७०६०