कोल्हापूर:प्रसारमाध्यम न्यूज
अॅप आधारित ओला, उबेर टॅक्सी सेवेला पर्याय म्हणून सहकारी तत्वावर टॅक्सी सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. भारत टॅक्सी नावाची ही सेवा लवकरच सुरु करण्यात येईल. ही सेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी बहुराज्य सहकारी टॅक्सी सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यात ही सेवा सुरू केली जाणार आहे. सहकारमंत्री अमित शहा अशी टॅक्सी सेवा सुरु करण्याचे सुतोवाच वर्षापुर्वी केले होते.
सहकारी तत्त्वावर ‘भारत टॅक्सी ही सेवा टप्याटप्याने देशभरात सुरू केली जाणार. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सेवा सुरू केली जाणार असून या सेवेसाठी दोनशे टॅक्सी चालकांची नोंदणी केली आहे. या योजनेची शास्त्रोक्त आखणी करण्याची जबाबादरी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) बंगळूरु यांच्यावर सोपविण्यात आली असून अॅपनिर्मितीसाठी म्हणजेच तांत्रिक भागीदारासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
भारत टॅक्सी सेवेचा देशभरातील प्रवासी आणि टॅक्सीचालकांना लाभ होईल. ही सेवा ओला, उबेरप्रमाणे अॅप आधारित असली तरी त्यात प्रवासी वा चालक यांची पिळवणूक होणार नाही. उलट टॅक्सीचालकांना जास्त पैसे मिळतील आणि लोकांचेही पैसे वाचतील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
सहकार क्षेत्रामध्ये सर्व सामान्याचे हित जपले जाते. नफ्याची विभागणीही समसमान होते. यामुळे सहकाराने बहुतांशी क्षेत्र व्यापली आहेत. विविध कार्यकारी सोसायट्यांना पेट्रोलपंप सुरु करू देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. आता सहकार तत्वावर टॅक्सी सेवा करण्यास केंद्र शासन आघाडीवर आहे. या सेवेचा नवतरुणांना रोजगारासाठी लाभ होईल. “Sahakar Taxi Cooperative Limited” या नावाने ही सहकारी संस्था Multi-State Co‑operative Societies Act नुसार कार्यरत राहणार आहे.