मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. सरकारच्या आर्थिक स्थितीबाबत विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील महत्त्वाच्या नगरविकास विभागाच्या निधीवाटपावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नियंत्रण मिळवलं आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप सुरू होते. मात्र, या निधीवाटपात अनेक ठिकाणी गरज, प्रस्तावांची सुसंगतता आणि शहानिशा न करता निधी वितरित केल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे निधी वाटपाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निधी वाटपावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःच नगरविकास विभागाच्या निधीवाटप प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारच्या निर्णयप्रक्रियेत आणि सत्ताकारणात ‘ बॉस ’ कोण? यावरही सूचक संकेत मिळाले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महायुतीतील अंतर्गत समन्वय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांतील अधिकार वाटप, तसेच आगामी निवडणुकांमधील निधीवाटपाच्या राजकीय गुंतवणुकीचा भाग या निर्णयामागे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला दिली गेलेली मोकळीक मर्यादित केली जात असल्याचे चित्र उभे राहत असून, याचा पुढील राजकीय परिणाम काय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
—————————————————————————————–