कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
२५ जुलै पासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असून, त्याच्या आदल्या दिवशी येणारी अमावस्या सर्वसामान्यतः ‘गटारी अमावस्या’ म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी अनेक ठिकाणी नॉनव्हेज आणि मद्यपान करणाऱ्यांचा उत्सव रंगतो. गच्ची पार्टी, विशेष जेवणावळी आणि ‘फेअरवेल टू नॉनव्हेज’ अशा पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र, हा खरा सण आहे का ?
‘ गटारी ’ नव्हे… ‘ गतहारी ‘ !
भाषाशास्त्रीय आणि सांस्कृतिक अभ्यासकांच्या मते, ‘गटारी अमावस्या’ हा सण आपल्याकडे कुठल्याही धार्मिक ग्रंथात किंवा पारंपरिक उत्सव यादीत नाही. हा शब्द ‘गतहारी’ या मूळ शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘गत’ म्हणजे मागे गेलेला आणि ‘हारी’ म्हणजे आहार. म्हणजेच, श्रावण महिन्यात ज्या गोष्टींचा त्याग करायचा आहे, अशा आहाराचा शेवटचा दिवस असा अर्थ या अमावस्येचा आहे.
परंपरेनुसार श्रावण महिन्यात मांसाहार व मद्यपान टाळलं जातं. यामागे धार्मिक कारणांबरोबरच पर्यावरणीय आणि आरोग्य दृष्ट्याही विचार आहेत. पावसाळ्यात प्राणी व मास्यांचे प्रजनन काळ असतो. त्याच प्रमाणे वातावरण दमट असल्याने पचनशक्ती कमी होते. त्यामुळे या महिन्यात हलका व सात्त्विक आहार घेण्याची शिफारस केली जाते.
‘गटारी’ संकल्पना कशी उदयाला आली ?
‘गतहारी’ या मूळ संकल्पनेचा लोकांमध्ये अपभ्रंश होऊन ‘गटारी’ असा शब्द रूढ झाला. कालांतराने यालाच खाणे, पिणे, मौजमजा यांचं प्रतीक मानून लोकांनी ‘गटारी अमावस्या’ म्हणून तिचा एक प्रकारचा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. यामध्ये धार्मिक संकल्पना मागे पडत गेल्या आणि सामाजिक सोहळा पुढे आला.
आजच्या तरुण पिढीसाठी हा दिवस ‘संधी’ आहे. शेवटचा मांसाहाराचा दिवस म्हणून. मात्र अनेक बुजुर्ग आणि संस्कृतीप्रेमींना हा बदल अनाठायी वाटतो. “हा सण नसून एक समजूत आहे. आपण आपल्याच परंपरेची खिल्ली उडवतो आहोत,” असं मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे. श्रावणाच्या आधीचा दिवस म्हणजे संयमाच्या जीवनशैलीकडे जाण्याची सुरुवात. तो परंपरेत ‘गतहारी’ या अर्थपूर्ण नावाने ओळखला जात होता. मात्र भाषेचा अपभ्रंश आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तो ‘गटारी’ झाला. यामागे हास्य असेल, चव असेल, पण त्याचबरोबर आपल्या परंपरेच्या मूळ भावनेचाही विसर पडू नये, हीच अपेक्षा !
————————————————————————————-