कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी यात्रा काळात भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात नो व्हेईकल झोन करण्यात येणार असून सर्व मंत्री आणि व्हीआयपींनी शिवाजी महाराज चौकातून चालत मंदिराकडे यावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. यात्रा काळात मोठ्या संख्येने मंत्री, आमदार, खासदार आपल्या गाड्यांचे ताफे घेऊन मंदिरापर्यंत पोहोचत असतात. यामुळे मंदिर परिसरात असणाऱ्या हजारो भाविकांना याचा फटका बसतो. हे टाळण्यासाठी आता यावर्षी मुख्यमंत्री वगळता सर्वांसाठी नो वेहिकल झोन करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. याची सुरुवात स्वतः पालक मंत्र्यांनी करीत यात्रा पाहणीसाठी आले असता त्यांनी शिवाजी चौकातून सर्व अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह चालत मंदिरात पोचले.
यात्रा कालावधीत हे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद
सर्व व्हीआयपींना झटपट व्हीआयपी दर्शन अपेक्षित असते, मात्र यात्रा कालावधीत हे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद राहणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. या सर्वांची सुरुवात आपल्यापासूनच केल्याचे सांगताना मंदिराकडे पायी चालत आलेल्या गोरे यांनी आज सर्वसामान्य भाविकांच्या सोबत मुखदर्शन घेत एक नवीन पायंडा घालून दिला आहे. मंदिर आणि चंद्रभागेची पाहणी करताना गोरे यांनी पायी जाणे पसंत केले असून चंद्रभागेच्या वाळवंटात असणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनाही सुनावल आहे. यावर्षी पाऊस काळ असल्याने पालखी मार्गावर आणि पंढरपूर परिसरात भाविकांना त्रास न जाणवणे म्हणून अनेक सुविधा उभ्या करण्यात येत असून जवळपास साडेसात लाख स्क्वेअर फुटाचे वॉटरप्रूफ मंडप ठीक ठिकाणी मार्गावर लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाची वारी नक्कीच वेगळी ठरणार असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार भाविकांना या यात्रेत व्हीआयपी मोमेंटचा कोणताही त्रास जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांसाठी प्रथमोपचारापासून ते आयसीयूपर्यंत सुविधा
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात आणि एकूणच वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्य आरोग्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून, त्यांना संपूर्ण पालखी मार्गावर सर्दी खोकल्यासारख्या प्राथमिक उपचारापासून अतिदक्षता विभागातील अत्यावश्यक उपचार पुरविण्याचे सूक्ष्म आणि व्यापक नियोजन केले आहे. वारी मार्गावर विशेषज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी असे मिळून वारी पंढरीची १,३०३ आरोग्यविषयक मनुष्यबळ सेवा देणार आहे. दरवर्षी वारी दरम्यान १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांना प्राथमिक आणि अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यात येतात.यंदा त्यामध्ये आणखी नवीन सेवांचा समावेश केला आहे.






