spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeविज्ञान - तंत्रज्ञानकोल्हापुरात “नो मोअर बॅक बेंचर्स” उपक्रम

कोल्हापुरात “नो मोअर बॅक बेंचर्स” उपक्रम

शिक्षणात समता – मल्याळम चित्रपटातून प्रेरणा

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शिक्षणात समानता आणि सहभाग वाढवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने “ नो मोअर बॅक बेंचर्स ” हा अभिनव उपक्रम राज्यात पहिल्यांदाच राबवला आहे. केरळ आणि तामिळनाडू मधील शाळांनी आधीच स्वीकारलेल्या या पद्धतीची प्रेरणा एका मल्याळम चित्रपटातून घेण्यात आली असून, त्यातून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
चित्रपटातून मिळालेली प्रेरणा
विनेश विश्वनाथ दिग्दर्शित Sthanarthi Sreekuttan या मल्याळम चित्रपटाने समाजातील “ पुढच्या बाकावर हुशार, मागच्या बाकावर कमकुवत ” हा समज दूर करण्यासाठी नवा दृष्टिकोन दिला. थिरुवनंतपुरम मधील एका उच्च प्राथमिक शाळेच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात शेवटी विद्यार्थी पारंपारिक रांग सोडून अर्धवर्तुळाकार बसतात आणि शिक्षक वर्गाच्या मध्यभागी बसतो. OTT प्लॅटफॉर्म Saina Play वर प्रदर्शित झाल्यानंतर केरळमधील अनेक शाळांनी ही बैठक पद्धती स्वीकारली.
कोल्हापूरने घेतला पुढाकार
राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात या बैठकीच्या नव्या पद्धतीची अंमलबजावणी झाली आहे. आता विद्यार्थी यु-आकारात बसतात, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांचे समान लक्ष राहते आणि वर्गात सर्वांना सहभागाची समान संधी मिळते. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी स्पष्ट केले की, “ मिशन ज्ञानकवच अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित व्हावं, त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलावं आणि प्रत्येकाला समान संधी मिळावी, यासाठी हा प्रयोग राबवतो आहोत.”

कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारची संकल्पना राबविण्याचा निश्चय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी घेतला असून त्यास सर्व तालुक्यातून उत्तम प्रतिसाद मिळात आहे.

नव्या व्यवस्थेचे परिणाम सकारात्मक दिसून येत आहेत. पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे. अनेक पालकांमध्ये “ माझा मुलगा मागे बसला, त्याला मुद्दाम मागे बसवलं ” अशा शंका निर्माण होत होत्या. मात्र, यु-आकारातील बैठकीमुळे या शंकांचे निरसन झाले आहे. पालकांनी जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, शिक्षणातील समानतेसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले.
संपूर्ण राज्यासाठी आदर्श
केरळ आणि तामिळनाडूने एका मल्याळम चित्रपटातून प्रेरणा घेऊन बैठक व्यवस्थेमध्ये बदल केला आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिणाम साधले. कोल्हापूर जिल्ह्यानेही हे प्रयोगशील पाऊल उचलून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श निर्माण केला आहे. यु-आकारातील बैठक व्यवस्था पुढे संपूर्ण राज्यभर लागू व्हावी, अशी पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांची अपेक्षा आहे.

कोल्हापूरमधील हा छोटासा पण प्रभावी प्रयोग शिक्षणात समतेचा नवा मार्ग दाखवत असून, विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला आणि एकोप्याला चालना देणारा ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात विचारपूर्वक बदल घडवण्याची ही सुरुवात पुढे अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे.

—————————————————————————————————————–
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments