कितीही स्थित्यंतरे आली तरी चित्रपटाचे ‘स्टोरीटेलिंग’ कायमच : डॉ. जब्बार पटेल

0
121
Dr. Jabbar Patel speaking at an open dialogue program at Shivaji University. Along with Dr. Shivaji Jadhav, Vice Chancellor Dr. Digambar Shirke and Dr. Sunil Kumar Lovete
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

चित्रपट ही अत्यंत सर्जनशील बाब आहे. या क्षेत्रात आज तंत्रज्ञानात्मक बदल गतीने होत आहेत. ही स्थित्यंतरे होत राहणार, आव्हाने बदलणार; मात्र गोष्ट सांगणे हा त्याचा मूळ गाभा मात्र कायम राहणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागात बी.ए. ( फिल्म मेकिंग ) च्या विद्यार्थ्यांसह संगीत व नाट्यशास्त्र तसेच अन्य विभागांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रसिक नागरिकांसमवेत आज डॉ. जब्बार पटेल यांच्या मुक्तसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात डॉ. पटेल यांनी उपस्थितांना त्यांच्या अभ्यासू आणि अनुभवी वाणीने खिळवून ठेवले. त्यांचा हा मुक्तसंवाद सुमारे दोन तासांहून अधिक काळ रंगला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे प्रमुख उपस्थित होते.
डाॅ.जब्बार पटेल
डॉ. जब्बार पटेल – आज चित्रपटसृष्टीसमोर तंत्रज्ञानासह मोबाईल, ओटीटी अशी अनेक आव्हाने उभी आहेत. मात्र, चित्रपटाच्या क्षेत्रात स्टोरीटेलिंगला सर्वाधिक महत्त्व आहे. या माध्यमाद्वारे चांगली गोष्ट सांगितली गेल्यास ती आवर्जून पाहणारे प्रेक्षकही लाभतात. हे स्टोरीटेलिंग एक तर साहित्यातून येते अगर अनुभवातून येते. त्यासाठी सकस वाचन आणि सातत्यपूर्ण काम करीत राहणे आवश्यक आहे. त्याखालोखाल दिग्दर्शकाचे महत्त्व असते. तो गोष्ट कशी मांडतो, हेही महत्त्वाचे ठरते. 
मला औपचारिक शिक्षण मिळाले नाही. त्यामुळे ते नव्या पिढीला मिळावे ही तळमळ माझ्या मनी असते. अशा शिकलेल्या मुलांकडून माझ्या अपेक्षाही मोठ्या आहेत. तथापि, शिक्षणामुळे अहंकार न येता नवे ज्ञान मिळविण्याची आस बाळगून त्यांनी या क्षेत्रात काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठाने जगभरातील अभिजात चित्रपटांचे संकलन करून ते विद्यार्थ्यांना पाहण्यास उपलब्ध करावेत, त्याचप्रमाणे चित्रपटविषयक ग्रंथांचा संग्रहही निर्माण करावा, असे आवाहन पटेल यांनी केले.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत आणि विकासात कोल्हापूरच्या कलाकारांचे महान योगदान आहे. त्यांच्या शैलीने काम करणाऱ्या येथील कलाकारांना ‘कोल्हापूर स्कूल’ म्हणून ओळखले जाते. इथली कार्यशैली, मापदंड, तंत्रज्ञान चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या ‘कोल्हापूर स्कूल’चे पुनरुज्जीवन व्हावे आणि येथील कलाकारांनी जागतिक स्तरावर ठसा उमटवावा. शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमामुळे कोल्हापूर स्कूलला निश्चितपणे ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के – चित्रपटसृष्टीत चांगली कारकीर्द घडवू पाहणाऱ्या क्षमतावान विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट व्हावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डॉ. पटेल यांच्या सूचनेनुसार ग्रंथ आणि चित्रपट यांचे संकलनही करण्यात येईल, याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, प्रवीण पांढरे यांनी परिचय करून दिला तर साक्षी वाघमोडे यांनी आभार मानले.

——————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here