प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
भारतीय लग्नसमारंभ म्हणजे थाटामाट, नातेवाईकांची गर्दी आणि चविष्ट जेवण. मात्र या आनंदाच्या वातावरणाचा गैरफायदा घेत अनेकदा आमंत्रण नसलेले,ओळख नसलेले लोक लग्नसमारंभात शिरून जेवणावर ताव मारतात. ‘बिन बुलाये मेहमान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा व्यक्तींना केवळ सामाजिकच नव्हे, तर कायदेशीर परिणामांनाही सामोरे जावे लागू शकते. कारण आमंत्रण नसताना लग्नसमारंभात जाणे हा कायद्याने थेट गुन्हा ठरू शकतो.
लग्नात न बोलावता जाणे म्हणजे अतिक्रमण
भारतीय दंड संहिता (IPC) नुसार कोणत्याही व्यक्तीने परवानगीशिवाय दुसऱ्याच्या मालमत्तेत प्रवेश करणे किंवा तिथे राहणे हा क्रिमिनल ट्रेसपास (Criminal Trespass) मानला जातो. लग्नसमारंभ, रिसेप्शन, पोस्ट-वेडिंग पार्टी हे खासगी स्वरूपाचे कार्यक्रम असतात. आयोजकांची स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष परवानगी नसताना अशा कार्यक्रमात प्रवेश केल्यास तो कायद्याच्या कक्षेत गुन्हा ठरतो.
कोणती कलमे लागू होतात?
या प्रकारात प्रामुख्याने खालील कलमे लागू होऊ शकतात :
कलम 441 – Criminal Trespass (गुन्हेगारी अतिक्रमण)
कोणतीही व्यक्ती दुसऱ्याच्या मालमत्तेत बेकायदेशीररीत्या प्रवेश करून तिथे गुन्हा करण्याच्या उद्देशाने किंवा मालकाला त्रास देण्याच्या हेतूने राहिल्यास हा गुन्हा ठरतो.
कलम 442 – House Trespass (घरात अतिक्रमण)
कोणतीही व्यक्ती घर, इमारत, तंबू, हॉल किंवा कार्यक्रमस्थळी बेकायदेशीर प्रवेश करते, तर तो ‘हाऊस ट्रेसपास’ मानला जातो. लग्नसमारंभ बहुतांश वेळा हॉल, लॉन, हॉटेल किंवा खासगी जागेत होतात. त्यामुळे हे कलम लागू होऊ शकते.
कलम 448 – House Trespass साठी शिक्षा
या कलमानुसार दोषी आढळल्यास १ वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कलम 452 – इजा, मारहाण किंवा धमकीची तयारी करून घरात अतिक्रमण
जर न बोलावता आलेल्या व्यक्तीने गोंधळ घातला, मारहाण केली, धमकी दिली किंवा अशा प्रकारची तयारी करून प्रवेश केला, तर हे गंभीर स्वरूपाचे गुन्हा मानले जाते.
या कलमानुसार २ ते ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.
फक्त जेवणासाठी आले तरी गुन्हा?
“आम्ही फक्त जेवणासाठी आलो होतो” हे कारण कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरले जात नाही. कारण आयोजकांची परवानगी नसताना कार्यक्रमस्थळी प्रवेश करणे हाच गुन्हा ठरतो. मोठ्या हॉटेलमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रम असल्याने ओळख पटत नाही, याचा फायदा घेऊन काहीजण प्रवेश करतात. मात्र तक्रार झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
आयोजकांनी काय काळजी घ्यावी?
सध्या अनेक लग्नसमारंभांमध्ये प्रवेशपत्रिका, क्यूआर कोड, ओळख पट्टी (ID bands) किंवा सुरक्षा रक्षक ठेवले जात आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे अशा ‘बिन बुलाये मेहमानां’पासून संरक्षण. लग्नात फुकट जेवण ही केवळ गंमत किंवा शहाणपणाची गोष्ट नसून, ती थेट फौजदारी गुन्हा ठरू शकते. आमंत्रण नसताना लग्नसमारंभात जाणाऱ्यांना प्रसंगी २ ते ७ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे “वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ” ही मानसिकता ठेवण्यापेक्षा कायद्याची जाणीव ठेवणेच शहाणपणाचे ठरेल.






