मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी लागणाऱ्या तब्बल ४५ हजार कोटी रुपयांच्या खर्चामुळे आता इतर जनहिताच्या योजनांवर थेट परिणाम दिसू लागले आहेत. ‘आनंदाचा शिधा’ यंदा गणेशोत्सवाच्या काळात दिला जाणार नाही, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. शिवाय, ‘ शिवभोजन थाळी ’ योजनेवरही आर्थिक संक्रांत ओढवली आहे.
आनंदाचा शिधा रद्द ; टेंडर प्रक्रियाही अडचणीत
छगन भुजबळ म्हणाले की, “‘आनंदाचा शिधा’ योजनेसाठी टेंडर प्रक्रिया दोन ते तीन महिने आधीच पूर्ण करावी लागते. आता सणासुदीचा काल नजीक असून टेंडर काढणं शक्य नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा सध्या देऊ शकत नाही.”
या योजनेसाठी दरवर्षी ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यायची. पण सध्या तिजोरीवरचा भार प्रचंड वाढल्याने योजनेला स्थगिती देण्यात आली आहे.
आनंदाचा शिधा योजना काय होती ?
सणासुदीच्या काळात गरीबांना दिलासा देण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू करण्यात आली होती. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केवळ १०० रुपयांत चार वस्तू – १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ आणि १ लिटर पामतेल मिळायचं.
ही योजना २०२२ च्या दिवाळीत सुरू झाली. त्यानंतर गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, दिवाळी, तसेच २०२४ मध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि शिवजयंती यासारख्या प्रसंगीही या किटचे वितरण करण्यात आले होते.
‘शिवभोजन थाळी’ही संकटात
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू असलेली ‘शिवभोजन थाळी’ योजना देखील आर्थिक अडचणीत सापडली आहे.
या योजनेसाठी वर्षाला १४० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाला केवळ २० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे थाळी पुरवठा, भरणा आणि केंद्रांच्या कामकाजात अडचणी येण्याची शक्यता आहे.
भुजबळ यांचे स्पष्ट शब्दात कबुली
“लाडकी बहीण योजनेसाठी राज्याच्या तिजोरीतून एकदम ४५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे इतर योजनांवर परिणाम होणं स्वाभाविक आहे. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. निधी उपलब्ध होताच योजनांचा फेरविचार केला जाईल,” असं भुजबळ यांनी सांगितलं.
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळत असला, तरी त्याचा आर्थिक भार इतर गरजूंवरील योजनांवर पडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. ‘आनंदाचा शिधा’ बंद पडल्याने सणासुदीच्या काळात गरीबांच्या ताटात आनंदाऐवजी निराशा वाढण्याची शक्यता आहे, आणि ‘शिवभोजन’ थाळीही काही काळासाठी बंद होण्याच्या मार्गावर आहे.
———————————————————————————————-