पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशाच्या पायाभूत विकासाला वेग देणाऱ्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात येणार आहे. हा प्रतिष्ठित सन्मान लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट ( हिंद स्वराज्य संघ ) यांच्या वतीने दिला जातो.
हा पुरस्कार शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, लोकमान्य टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथीच्या औचित्याने पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि या मान्यवरांच्या साक्षीने नितीन गडकरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला टिळक स्मारक ट्रस्टचे आधारस्तंभ आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. कार्यक्रमाला टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू व ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, सरिता साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे स्वरूप आणि गौरवशाली इतिहास
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे आहे. १९८३ पासून सुरू असलेल्या या पुरस्काराचा पहिला सन्मान क्रांतिकारक नेते एस. एम. जोशी यांना मिळाला होता.
या पुरस्काराने इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, शरद पवार, प्रणव मुखर्जी, एन. आर. नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, डॉ. के. सिवन, डॉ. सायरस पुनावाला, बाबा कल्याणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या अनेक दिग्गजांना गौरविण्यात आले आहे.
टिळकांचा विचार आणि गडकरींचे कार्य
पत्रकार परिषदेत डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांची स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुःसूत्री आजही तितकीच काळानुरूप आणि प्रेरणादायी आहे. नितीन गडकरी यांचे राजकीय कार्य केवळ सत्तेसाठी नसून सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा मार्ग आहे, ही भूमिका त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केली आहे. ते लोकमान्यांच्या विचारांचे आजच्या काळातील प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
विशेष ग्रंथ प्रकाशन
या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान’ पुरस्काराने गौरविलेल्या व्यक्तिमत्वांवर आधारित एक इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.
———————————————————————————–



