न्यूयॉर्क : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १७ ऑगस्ट २०२५ रोजी न्यूयॉर्क शहरात झालेल्या ‘ इंडिया डे ’ परेडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या या परेडमध्ये छत्रपती फाऊंडेशनतर्फे सादर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीरथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कीर्तीरथावर भारतीयांनी शिवाजी महाराज, जिजाऊ, बाल शिवबा आणि मावळे यांची वेशभूषा करून ऐतिहासिक क्षण जिवंत केले. लहान मुलांपासून महिलांपर्यंत आणि युवकांपर्यंत सर्वांनी दिमाखदार अभिनय व आकर्षक पोशाखांद्वारे महाराष्ट्राचा पराक्रम आणि वारसा साकारला. या कीर्तीरथासोबत जल्लोश ढोल-ताशा पथकाच्या ५० हून अधिक वादकांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर गगनभेदी गजर घुमवला.
बॉलिवूड नाट्य दिग्दर्शक संदेश रेड्डी यांच्या रुद्र डान्स अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी लेझीमसह विविध नृत्यांचे सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले. एकूण १०० हून अधिक लोकांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीचे भव्य प्रदर्शन सातासमुद्रापार केले.
भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत बिनया प्रधान यांनी कीर्तीरथाचे कौतुक करताना म्हटले, “छत्रपती फाऊंडेशनचा कीर्तीरथ दरवर्षी दिमाखदार असतो, पण त्यापेक्षाही त्यांचे कार्य अधिक दिमाखदार आहे.”
दरम्यान, या परेडचे ग्रँड मार्शलपद लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवेरकोंडा यांनी भूषवले. तर मिशिगन राज्याचे यू.एस. हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटीव्ह सदस्य श्रीकांत ‘श्री’ ठाणेदार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी रथावरून प्रचंड जनसमुदायाला अभिवादन करत भारतीय संस्कृतीचे कौतुक केले. परेडचा शुभारंभ न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक आडम्स यांच्या हस्ते झाला.
न्यूयॉर्कच्या Parade Life या वृत्तपत्राने शिवछत्रपती कीर्तीरथाला “Best Float” असे गौरवले असून, “शिवराज्याचा संदर्भ अमेरिकेच्या लोकशाहीच्या मुळांशी जोडला जातो” असे मत व्यक्त केले.



