कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
ऑगस्ट पासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) व्यवहारांसंबंधी काही महत्त्वाचे नवीन नियम लागू होणार आहेत. डिजिटल व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने सुरक्षा आणि व्यवहारांची पारदर्शकता यासाठी काही सुधारणा केल्या आहेत. विशेषतः पेटीएम, फोनपे, गुगल पे आणि इतर युपीआय अॅप्स वापरणाऱ्यांसाठी या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे.
नवीन नियम असे :
दिवसातून फक्त ५० वेळा शिल्लक तपासता येणार. एका युपीआयद्वारे आता फक्त तीन निश्चित वेळेत प्रक्रिया केले जातील- सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते संध्याकाळी ५ आणि रात्री ९.३० नंतर.
एसबीआय को-ब्रँडेड क्रेडिट कार्डधारकांच्या मोफत विमा कव्हरमध्ये मोठा बदल होणार आहे. एसबीआयने अनेक इलीट आणि प्राईम कार्ड्सवर उपलब्ध असलेले विमान अपघात विमा कव्हर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी, या कार्ड्सना ५० लाख ते १ कोटी पर्यंतचे विमा संरक्षण मिळत होते, परंतु आता ही सुविधा बंद केली जाईल.
घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये व्यावसायिक सिलिंडर ६० रुपयांनी स्वस्त झाले, परंतु घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. यावेळी घरगुती ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
तेल कंपन्या अनेकदा महिन्याच्या पहिल्या दिवशी सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये बदल करतात. पण, एप्रिलपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. ऑगस्टमध्ये या किमतीत कोणते बदल होतात हे लवकरच समजेल.
आरबीआय चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) ची बैठक ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान होणार आहे, या बैठकीत व्याजदरांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा बैठकीनंतर दरांमध्ये बदल जाहीर करू शकतात, ज्यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि ईएमआयवर परिणाम होऊ शकतो.