नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कौन्सिलची अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून दोन दिवसांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात येणार असून त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. या बैठकीत किराणा माल, तयार अन्न, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, शालेय साहित्य आणि वाहनांवरील कर कमी करण्याच्या तसेच इलेक्ट्रिक वाहनांवरील कर वाढवण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे.
या बैठकीत १५० हून अधिक उत्पादनांवरील कर कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तूप, बटर, चीज, ब्रेड, रोटी, पराठा, खाखरा, चपाती, नमकीन, मशरूम, खजूर यासारख्या वस्तूंवर कर ५ टक्के किंवा शून्य टक्के करण्याची शक्यता आहे. मिठाई, पॅकेज्ड स्नॅक्स, चॉकलेट, पेस्ट्री, आईस्क्रीम आणि तृणधान्यांवरील कर १८ टक्के वरून ५ टक्के पर्यंत कमी होऊ शकतो.
दुग्धजन्य पदार्थ : तूप, बटर, चीज यांची किंमत कमी होऊन वापर वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे आयातीत तेलाची मागणी घटेल आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल.
शालेय वस्तू : नकाशे, ग्लोब, पेन्सिल शार्पनर, कॉपी, लॅब नोटबुक यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी १२ टक्के वरून शून्य टक्के पर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाहने : कार व दुचाकींवरील जीएसटी २८ टक्के वरून १८ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे वाहन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या४ कर स्लॅबऐवजी फक्त २ स्लॅब (५ टक्के आणि १८ टक्के) ठेवण्याचा विचार. लक्झरी कार, एसयूव्ही, तंबाखूजन्य वस्तूंवर ४० टक्के विशेष कर लागू होऊ शकतो.
लहान व्यावसायिकांना फायदा : वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की जीएसटी २.० प्रणालीमुळे अनुपालनाचा भार कमी होईल आणि लहान व्यवसाय व स्टार्टअप्ससाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.