नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक वाटचाल करत केंद्र सरकारने ‘ राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ ‘ ला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या धोरणाच्या माध्यमातून भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
भारताच्या क्रीडाक्षेत्रात नवा टप्पा
मागील काही वर्षांत भारतीय खेळाडूंनी केवळ क्रिकेटमध्येच नव्हे, तर ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, तसेच विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. पी.व्ही. सिंधू, नीरज चोप्रा, मीराबाई चानू, बजरंग पुनिया यांसारख्या खेळाडूंनी देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणखी भक्कम आणि व्यापक पद्धतीने क्रीडा क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प केला आहे.
२०३६ च्या ऑलिंपिकसाठी विशेष लक्ष्य
राष्ट्रीय क्रीडा धोरण-२०२५ मध्ये भारताला २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी तयारी करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भारताने २०३६ चे ऑलिंपिक आयोजित करण्यासाठी निवेदन दिलं असून, त्या अनुषंगाने खेळाडू, सुविधा आणि क्रीडा व्यवस्थापन या सर्व अंगाने देशाची तयारी सुरू केली जाणार आहे.
धोरणाची वैशिष्ट्ये :
- तळागाळातील क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन – ग्रामीण भाग, शाळा, महाविद्यालयं, जिल्हा आणि राज्य स्तरावरील स्पर्धांना भक्कम आधार देण्यात येणार आहे.
- खेळाडूंच्या गुणवत्तेची ओळख – युवा खेळाडूंना शोधून काढण्यासाठी खास कार्यक्रम आखण्यात येणार आहेत.
- सुविधांचा विकास – देशभरात अत्याधुनिक क्रीडा संकुल, प्रशिक्षण केंद्रं आणि सुविधा विकसित केली जाणार आहेत.
- कोच आणि तंत्रज्ञांची गुणवत्ता वाढविण्यावर भर – प्रशिक्षक आणि क्रीडा विज्ञानतज्ज्ञ यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष योजना राबविली जाणार आहे.
- खाजगी सहभागाला प्रोत्साहन – कॉर्पोरेट क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि खासगी भागीदारीतून क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
- महिला आणि दिव्यांग खेळाडूंना संधी – महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र योजना व सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, ” खेळ हा केवळ विजयासाठी नसून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. नव्या क्रीडा धोरणामुळे केवळ मैदानावरील यश नव्हे तर युवा वर्गाची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक प्रगती साधता येईल.”
भारत क्रीडा क्षेत्रात सुवर्णयुगाकडे वाटचाल करत आहे. राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ हे त्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून खेळाडू घडवून, त्यांना जागतिक स्तरावर चमकवण्याचा संकल्प या धोरणातून व्यक्त होत आहे.
————————————————————————————






