नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लावल्याने दोन्ही देशांतील व्यापारिक तणाव वाढला आहे. त्यामुळे भारताने पर्यायी बाजारपेठांचा शोध सुरू केला असून, या पार्श्वभूमीवर जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीत व्यापार, उद्योग, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही देशांमध्ये करार आणि आश्वासने देण्यात आली.
व्यापार व उद्योग सहकार्य
पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले की, “जर्मन उद्योगांसोबत काम करण्यास भारत उत्सुक आहे. त्यांच्या समस्यांवर आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. सेमीकंडक्टर हे भविष्यातील महत्त्वाचे क्षेत्र असून भारतातील तरुण त्यात मोठे योगदान देऊ शकतात.”
तसेच, निर्यात निर्बंध कमी करण्यावर चर्चा झाली असून आगामी काळात भारत-जर्मनी व्यापार वाढणार आहे. त्यामुळे अमेरिकेला फटका बसण्याची शक्यता आहे, कारण आतापर्यंत अमेरिकेला जाणारा माल जर्मनीला वळवला जाऊ शकतो.
इस्रो भेट व ग्रीन एनर्जी सहकार्य
जयशंकर पुढे म्हणाले की, वडेफुल यांनी इस्रोला भेट दिली आणि दोन्ही देश भविष्यात अंतराळ कार्यक्रमात एकत्र काम करू शकतात.
तसेच, ग्रीन हायड्रोजन व ग्रीन एनर्जी फायनान्स या क्षेत्रात सहकार्य करण्यावर भर देण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : भारतात शिक्षण घेणाऱ्या जर्मन विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे तर जर्मनीतही भारतीय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. त्यामुळे महाविद्यालयीन भेटींसाठी मोफत व्हिसा देण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
जर्मनीचा एफटीएला पाठिंबा
परराष्ट्र मंत्री वडेफुल म्हणाले की, “आम्ही भारत आणि युरोपियन युनियनमधील एफटीए (मुक्त व्यापार करार) ला पाठिंबा देत आहोत. या वर्षाच्या अखेरीस हा करार पूर्ण होऊ शकतो.”
ते पुढे म्हणाले की, “भारत लवकरच AI आणि एरोस्पेस क्षेत्रात आघाडीवर असेल. यात जर्मनीसोबतची भागीदारी निर्णायक ठरेल. केवळ तांत्रिक प्रगती नव्हे तर जबाबदार आणि नैतिक एआय विकासालाही भारत-जर्मनी संबंध हातभार लावतील.”
अमेरिके सोबतचे व्यापारिक तणाव वाढत असताना भारत-जर्मनी भागीदारीला नवी दिशा मिळाली आहे. या सहकार्यामुळे व्यापारासोबत तंत्रज्ञान, ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रातही दोन्ही देश भविष्यात अधिक जवळ येतील.