कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यंदाच्या पर्यटन हंगामात कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षक आणि पारंपरिक अनुभव देण्यासाठी बैलगाडी सफरीची नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात, पारंपरिक ग्रामीण अनुभवाची जोड लाभणार आहे.
जागतिक वारसास्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर आता फुलांचा रंगोत्सव सुरू झाला आहे. श्रावण सरी कोसलळ्यानंतर येथील पठारावर विविध रंगबेरंगी फुलांची चादर पसरल्याचं दिसून येत आहे. महत्वाच्या 132 फुलांच्या जातींपैकी तेरडा, सीतेची असवे, धनगरी फेटा, मिकी माऊस, कंदील पुष्प आणि चवर ही विविध रंगांची फुले येऊ लागली आहेत.
फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी बैलगाडीची सोय केली आहे. या सफरीतून पर्यटकांना प्रसिद्ध कुमोदिनी तलावापर्यंत फेरफटका मारता येणार असून, या मार्गावर त्यांना पठारावरील निसर्गसौंदर्य, फुलांच्या रंगीबेरंगी साजशृंगाराचा आनंद लुटता येणार आहे. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ यांच्या संयुक्त उपक्रमातून ही सेवा सुरू करण्यात आली असून, यामध्ये स्थानिक बैलगाड्यांचा वापर केला जात आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. बैलगाडी सफरीसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच, पर्यटकांच्या सोयीसाठी गाइडचीही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रत्येक वर्षी कास पठारावरील फुलांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येतात. यंदा बैलगाडी सफरीमुळे त्यांचा अनुभव अधिक संस्मरणीय ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.