कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने सुरू असून, येत्या काळात शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक ती मदत वेळेत दिली जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य तथा सहपालकमंत्री कोल्हापूर जिल्हा माधुरी मिसाळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात त्यांनी त्यांच्या कार्यभाराखालील विविध विभागांचा आढावा घेतला.
सहपालकमंत्री माधुरी मिसाळ – श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासह श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना त्या ठिकाणी व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना पुनर्वसनाबाबत जी काही भीती आहे, त्याबाबत प्रशासनाकडून त्यांचे गैरसमज दूर करा म्हणजे आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ते सहकार्य करतील. श्री अंबाबाई मंदिराबाबत मागील दोन भेटी दरम्यान विविध कामांचा अंतर्भाव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यासह विविध कामांचा समावेश करून तयार केलेल्या मंदिर विकास आराखड्यात अजून शंभर कोटी रुपयांच्या कामांचा अंतर्भाव केल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. संबंधित व्यावसायिकांबरोबर येत्या काळात बैठका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवून पुनर्वसनाबाबतची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या हद्दवाढीबाबतही सह पालकमंत्री यांनी आजूबाजूच्या गावांमधून प्राधान्याने काही निवडक गावांचा समावेश करून त्या गावांसाठी महानगरपालिका कोणत्या सुविधा देत आहे आणि देणार आहे, याबाबत माहिती देऊन इतर गावांपुढे एक चांगले उदाहरण निर्माण करा, यामुळे आजूबाजूच्या गावांमधील हद्दवाढीबाबतचे गैरसमज दूर करता येतील, अशा सूचना त्यांनी केल्या.
कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा नदीच्या व राष्ट्रीय महामार्गाच्या आतील गावांचा हद्द वाढीमध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे सांगून यातील दहा गावे शहरात एकरूप झाल्याचे सांगितले. याचबरोबर शहरातील रस्त्यांसाठी मागणी केलेला उर्वरित निधीही मिळावा, अशी मागणी सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे केली.
उपस्थिती- राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
तसेच, त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक बसेसची मागणी असल्यास त्वरित प्रस्ताव देण्यात यावा, अशा सूचना केल्या. तसेच प्रत्येक एसटी स्टँडमधील स्वच्छतागृहांची व्यवस्था चांगली असल्याची खात्री करून आवश्यक दुरुस्त्या करण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांना सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा मंडळातील ३१ वर्षांच्या सेवेबद्दल सन्मान सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिकेसह इचलकरंजी महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबतचा आढावा सह पालकमंत्री मिसाळ यांनी घेतला. यावेळी त्यांनी सांगितले, दरवर्षी पावसाळा येण्याआधी नालेसफाईसह इतर अनेक प्रकारची कामे केली जातात. या काळात धावपळ करून कामे करण्यापेक्षा वर्षातील इतर कालावधीतही पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शाश्वत तयारी केली जावी.
भेटीदरम्यान सहपालकमंत्री माधुरी ताई मिसाळ यांनी अंबाबाई मंदिरात आणि जोतिबा मंदिरात जाऊन विधीवत पूजा करून विकास आराखड्याचा अनुषंगाने माहिती जाणून घेतली.
————————————————————————————————-