The Navratri festival has begun in full swing at Karveer Niwasini Ambabai Temple and preparations have now reached the final stage.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू झाली असून तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाविकांना देवीचे दर्शन सुरळीत, कमी वेळेत आणि सोयीस्कर व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेसाठी मंडप उभारण्यात आला असून ऊन वा पावसाचा त्रास भाविकांना होणार नाही, अशी काळजी घेतली गेली आहे.
नवरात्रौत्सव काळात रोज सरासरी तीन ते चार लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या काळात देवीचा पालखी सोहळा, नगर प्रदक्षिणा तसेच ललित पंचमीच्या दिवशी होणारी टेंबलाई देवीची भेट हे सोहळे विशेष आकर्षण ठरणार आहेत. त्याचबरोबर मंदिरात धार्मिक पूजाविधी, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
दरम्यान, वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने यंदा पोलिसांकडून एआय ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यासाठी दोन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या यंत्रणेमार्फत मंदिर परिसरातील गर्दीवर सतत नजर ठेवली जाईल. संभाव्य आपत्कालीन धोके वा दुर्घटनांची पूर्वसूचना मिळाल्यास पोलिस तत्काळ कारवाई करू शकतील.
वाहतूक व्यवस्थापनासाठी देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असून शहरातील रस्त्यांवरील गर्दी, कोंडी व पर्यायी मार्गांची माहिती थेट वाहतूक पोलिसांना मिळणार आहे. यामुळे भाविकांचा प्रवास सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर भक्तिभावाने न्हाऊन निघाले असून यंदाचा उत्सव भक्तीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सुरक्षिततेने पार पडणार आहे.
सुवर्ण दागिन्यांना झळाळी; सोन्याची पालखीही स्वच्छ
अंबाबाईच्या सुवर्ण अलंकारांची गुरुवारी स्वच्छता करण्यात आली.
शारदीय नवरात्रौत्सवाच्या स्वागतासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या सुवर्ण अलंकारांची व सोन्याच्या पालखीची गुरुवारी स्वच्छता करण्यात आली. देवीच्या नित्य व विशेष पूजाविधींमध्ये परिधान होणारे दागिने परंपरेनुसार स्वच्छ करून त्यांना नवी झळाळी देण्यात आली. शुक्रवारी अंबाबाईच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वस्तूंची स्वच्छता केली जाणार आहे.
अंबाबाईच्या खजिन्यात यादव, शिलाहार, आदिलशाही काळातील ऐतिहासिक दागिन्यांचा समावेश असून ते आजही पूजाविधींमध्ये वापरले जातात. वर्षभरातील नित्यपूजेसाठी सोन्याचे दागिने वापरले जातात, तर नवरात्रौत्सव आणि विशेष सालंकृत पूजेसाठी रत्नजडित अलंकार परिधान केले जातात.
अंबाबाईच्या खजिन्याचे हवालदार महेश खांडेकर यांच्या देखरेखीखाली महेश कडणे, गजानन कवठेकर, दादा कवठेकर व कारागिरांनी ही स्वच्छता पार पाडली. दागिन्यांना झळाळी आणण्यासाठी कोणत्याही केमिकलचा वापर न करता रिठ्याचे पाणी व बारीक वाळू वापरण्याची परंपरा यंदाही पाळण्यात आली.
स्वच्छतेनंतर सुवर्ण अलंकार आणि पालखीला नवा लखलखाट आला आहे. यामध्ये किरीट, गदा, पावले, चिंचपेटी, बोरमाळ, कंठी, मंगळसूत्र, नथ, कानाचे मोरपक्षी, कुंडले, मोहराची माळ, चंद्रहार, चाफेकळी हार, ठुशी, म्हाळुंग, कवड्याची माळ, सिंह यांचा समावेश आहे. तर विशेष पूजेत वापरल्या जाणाऱ्या नवरत्नजडित किरीट, जडावाचे मोरपक्षी, कुंडले, चिंचपेटी, पेंडल, लप्पा हार, सात व सोळा पदरी कंठी, श्रीयंत्र व मोत्याची माळ या दागिन्यांनाही झळाळी देण्यात आली.
देवीच्या सोन्याच्या पालखी, सोन्याचे मोर्चेल, सोन्याचा सिंह व गदा यांचीही खास स्वच्छता झाली असून आता हे सर्व अलंकार व वस्तू नवरात्रौत्सवात देवीच्या सालंकृत पूजेसाठी सज्ज झाल्या आहेत.