कोल्हापूर : प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना गुरुवारी वेगळीच दिशा मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत हस्तक्षेप करत “कोणालाही करा, पण अध्यक्ष महायुतीचा झालाच पाहिजे” अशी स्पष्ट सूचना दिल्याने सगळ्या घडामोडींना वेगळे वळण मिळाले. यानंतर नविद मुश्रीफ यांचे नाव पुढे आले असून, त्यांना तातडीने परदेशातून परत बोलावण्यात आले आहे.
नविद मुश्रीफ गुरुवारी संध्याकाळी थेट हेलिकॉप्टरने कोल्हापूरमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कागलमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि समर्थकांनी जमवाजमव केली होती. अभिनंदनाचे फलक लावून आनंद व्यक्त करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे, नविद यांची अध्यक्षपदासाठी निवड होऊ नये, अशी भूमिका सुरुवातीला स्वयं हसन मुश्रीफ यांनी घेतली होती. “मी केडीसीसी बँकेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे गोकुळ सारख्या दुसऱ्या मोठ्या संस्थेचे नेतृत्व माझ्याच घरात देणे योग्य नाही,” असे त्यांचे म्हणणे होते. तसेच, यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चुकीचा संदेश जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर हसन मुश्रीफ यांची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून आले. अध्यक्ष निवडीच्या आदल्या दिवशी ‘आमच्यात एकमत आहे’ असे सांगणाऱ्या आघाडीतील नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास तणावपूर्ण बैठक झाली. शेवटी, अध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी दुपारी बंद पाकिटातून नाव जाहीर करण्याचा निर्णय हसन मुश्रीफ यांनी घेतल्याचे जाहीर केले.
या पार्श्वभूमीवर, आज ३० मे रोजी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची निर्णायक बैठक पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी ‘नविद की शशिकांत पाटील’ या शर्यतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणेही बदलण्याची शक्यता असून, गोकुळ अध्यक्षपदाची ही निवड जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे.
——————————————————————————————-