कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने यशाची बाजी मारत नाविद मुश्रीफ यांना अध्यक्षपद बहाल केल्याने कोल्हापुरातील राजकारणाला नवे परिमाण मिळाले आहे. काँग्रेसचे सतेज उर्फ ‘बंटी’ पाटील यांना यामध्ये मोठा धक्का बसला असून, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (शिंदे गट) अशा त्रिकुट महायुतीने ‘मुन्ना’ म्हणजेच नाविद यांच्यामार्फत सहकारातील सत्ता बळकावली आहे.
सध्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे बंड शांत करण्यासाठी गोकुळमध्ये सत्तेत असलेले हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी सतेज पाटील यांच्याशी सहकार टिकवण्याचा प्रयत्न केला, मात्र, महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट संकेत आल्यानंतर त्यांनी आपली दिशा बदलली आणि नाविद यांच्या नावाला पाठबळ दिले.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत शशिकांत पाटील (चुयेकर) , भाजपचे अंबरीश घाटगे आणि शिवसेनेचे अजित नरके यांची नावे सुरुवातीला आघाडीवर होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचलेल्या बैठकीनंतर नाविद मुश्रीफ यांचं नाव अंतिम करण्यात आलं. सुरुवातीला केवळ दबक्या आवाजात त्यांचं नाव चर्चेत होतं.
” गोकुळ सारख्या संस्थेवर ताबा मिळवणं म्हणजे केवळ दूध उत्पादकांची मर्जी नाही, तर कोल्हापूरच्या सत्तानाट्यात निर्णायक ‘किंगमेकर’ होण्याची संधी असते. हे लक्षात घेता, नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदावर झालेली निवड ही महायुतीच्या पुढील राजकीय डावपेचांतील एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.”
२०२१ पासून नाविद मुश्रीफ हे गोकुळच्या संचालक मंडळावर कार्यरत असून, त्यांनी संस्थेच्या विविध कारभारात सक्रिय सहभाग घेतला आहे. यापूर्वी २०१० मध्ये ते छत्रपती शिवाजी विकास सोसायटीचे संचालक होते. तसेच, सध्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि पार्श्वभूमी लक्षात घेता, गोकुळच्या अध्यक्षपदासाठी ते योग्य मानले गेले.
या घडामोडींमुळे कोल्हापूरच्या राजकारणात मुश्रीफ कुटुंबाचं वजन आणखी वाढलं आहे. विशेषतः ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे आणि सहकारी चळवळीतील त्यांचा प्रभाव अधिक घट्ट झाला आहे.
———————————————————————————————-