गच्चीवर सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग : दिलीप माळी यांचा प्रेरणादायी प्रवास

0
747
In the special dialogue program 'Chala Boluya' organized by 'Prasar Madhyam', Dilip Mali spoke on the topic of terrace gardens and natural farming.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

शहरी भागात जागा मर्यादित असली तरीही टेरेसवर शेती करणे शक्य आहे, असा यशस्वी अनुभव दिलीप माळी यांनी दिला आहे. २०१६ पासून त्यांनी आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत सुरू केलेल्या ऑरगॅनिक भाजीपाल्याच्या प्रयोगातून त्यांनी अनेक लोकांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे. भाजीपाल्यापासून ते घरच्या कचऱ्यापासून खत तयार करण्याच्या आधुनिक आणि सोप्या पद्धतीपर्यंत दिलीप माळी यांनी सादर केलेले मार्गदर्शन ‘चला बोलूया’ कार्यक्रमात रंगत वाढवत गेले.

वाढत्या शहरीकरणामुळे अंगण, परसदार आणि झाडं हळूहळू शहरांतून गायब होत चालली आहेत. अशा काळात निसर्गाशी नाळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील दिलीप माळी यांनी केला आहे. गच्चीवर सेंद्रिय शेती करत एक आदर्श उभा केला आहे. त्यांचा हा प्रवास ‘प्रसारमाध्यम’ आयोजित ‘चला बोलूया’ या विशेष संवाद कार्यक्रमात उलगडला. यावेळी प्रसारमाध्यम चे संचालक प्रताप पाटील, मार्गदर्शक डाॅ.राजेंद्र पारिजात आदी मान्यवर उपस्थित होते.

‘प्रसारमाध्यम’ आयोजित ‘चला बोलूया’ या विशेष संवाद कार्यक्रमात डाॅ. दिलीप माळी यांचे स्वागत करताना संचालक प्रताप पाटील, मार्गदर्शक डाॅ.राजेंद्र पारिजात आदी

शहरात राहूनही त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर तब्बल २०० पेक्षा अधिक प्रकारच्या भाज्या आणि सफरचंद, द्राक्ष यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचं उत्पादन सुरू केलं आहे. हे सगळं त्यांनी कोणतेही बाहेरचं रासायनिक खत किंवा फर्टीलायझर न वापरता, केवळ घरच्या ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या कंपोस्टवर उभं केलं आहे.

त्यांचा प्रवास २०१६ मध्ये घराशेजारील मोकळ्या जागेत सुरू झाला. पण शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या इमारतींमुळे पुरेसं ऊन न मिळाल्यानं त्यांनी २०१८ पासून गच्चीकडे वळण्याचा निर्णय घेतला. गच्चीचं वॉटरप्रूफिंग करून त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला आणि फळबाग फुलवायला सुरुवात केली.

दिलीप माळी यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ स्वतःसाठीच ही वाट चालत नाहीत तर इतरांना मार्गदर्शनही करत आहेत. शहरी भागात अनेकांना गच्चीवर किंवा परसदारी शेती करण्याची आवड असते, पण योग्य माहितीच्या अभावामुळे ती प्रत्यक्षात येत नाही. माळी हे लोकांना सेंद्रिय शेती, कंपोस्ट निर्मिती आणि लागवड या सगळ्या गोष्टींविषयी मार्गदर्शन करत असून अनेक शहरी कुटुंबांना या दिशेने प्रवृत्त करत आहेत.

त्यांचा हा प्रयोग शहरीकरणाच्या झगमगाटात हरवत चाललेल्या निसर्गाची आठवण करून देणारा आहे आणि एक नवा पर्यावरणपूरक पर्यायही. त्यांच्या गच्चीवर सध्या २२ प्रकारच्या भाज्या आणि अनेक प्रकारची फळं यशस्वीरित्या उगवली जात आहेत.

त्यामध्ये पारंपरिक भारतीय भाज्यांबरोबरच काही विदेशी भाज्यांचाही समावेश आहे :

🔸 पारंपरिक भाज्या: दोडका, कारली, दुधी, पडवळ, भेंडी, रताळं, लसूण, कांदा
🔸 परदेशी भाज्या (लेटेस्ट प्रकार): ब्रोकोली, झुकिनी

हे सगळं काम शास्त्रोक्त पद्धतीनं, स्वखर्चाने आणि घरगुती कंपोस्टवर चालत आहे. “आमचं उद्दिष्ट हेच आहे की एकही गोष्ट बाहेरून आणायची नाही. ना खत, ना रासायनिक फर्टीलायझर. आपल्याकडे उपलब्ध गोष्टींपासून सेंद्रिय उत्पादन कसं करायचं, हेच आम्ही प्रत्यक्ष कृतीतून दाखवत आहोत,” असं दिलीप माळी सांगतात. त्यांच्या या प्रयोगातून शहरी भागात राहणाऱ्या अनेकांना प्रेरणा मिळते आहे. ते नियमित मार्गदर्शन सत्रही घेतात, जेणेकरून इतरांनीही घरच्या घरी अन्ननिर्मितीची ही हरित चळवळ सुरू करावी.

टेरेसवर शेती करताना माती कमी वापरावी –

माळी सांगतात की, “टेरेसवर शेती करताना कुंडीमध्ये २० % माती वापरावी म्हणजे वजन कमी राहतं आणि पाण्याचा निचरा चांगला होतो.” त्यासाठी त्यांनी खास मृदमिश्रण वापरलं आहे ज्यामध्ये कंपोस्ट, ओला कचरा आणि नारळाची तंतू, बायोडिग्रेडेबल वेस्ट यांचा समावेश आहे. ६० % घरगुती ओला कचरा + २० % माती + २० % कंपोस्ट खत अशा प्रमाणात मिश्रण तयार करून त्या बादल्या भरल्या जातात. याच सेंद्रिय माध्यमातून त्यांनी विविध भाज्या आणि फळांची लागवड केली आहे.

“आम्ही जेव्हा पहिल्यांदा कुंडी भरली, तेव्हा तिचं व्यवस्थित पाणी निचरा आणि मुळांना मोकळीक मिळेल अशी रचना केली. त्यामुळे ४-५ वर्षे झाली तरी माती बदलण्याची गरज भासली नाही,” असं ते आवर्जून सांगतात.

किडींचा नैसर्गिक बंदोबस्त –

शहरी शेतीत सर्वात मोठं आव्हान असतं. कीड प्रादुर्भाव. यावर माळी यांचा सेंद्रिय उपाय ठाम आहे. त्यांच्या मते, “जर माती कसदार ठेवली, तर झाडांची प्रतिकारक शक्ती वाढते आणि कीड नियंत्रण नैसर्गिक पद्धतीनं होतं.”

शहरात पांढऱ्या माव्याचा आणि काळ्या माव्याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. माळींचा अनुभव असा सांगतो की, जर ही शेती गार्डनमध्ये (जमिनीवर) केली तर परस्परांमध्ये झाडं असल्यामुळे कीड वेगाने पसरते. पण टेरेसवर झाडांची मांडणी नियंत्रणात ठेवता येते, त्यामुळे कीड नियंत्रण सहज शक्य होतं.

प्रत्येक झाडाचं वेगळं नियोजन –

त्यांनी प्लास्टिकच्या बादल्यांमध्ये आणि हलक्या कुंड्यांमध्ये भाज्या लावल्या असून, या सगळ्याच झाडांमध्ये नियमित फेरफार करून विविधता राखली आहे. “कीर्ती डायव्हर्ट” ठेवण्यासाठी म्हणजे सगळ्या झाडांना समान कीड लागू नये, यासाठी झाडांची आंतरशेती (intercropping) त्यांनी अंगीकारली आहे.

आत्मनिर्भरता –

दिलीप माळी यांचा अनुभव आज अनेक शहरी कुटुंबांना प्रेरणा देतो आहे. एका ठिकाणी राहूनही आपण घरच्या घरी संपूर्ण भाजीपाला आणि काही प्रमाणात फळं देखील उगवू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्यांची टेरेस फार्मिंग.

“आपल्याकडे माती आहे, घरचा कचरा आहे आणि थोडा वेळ आहे, तर आपल्याला कोणतीही गोष्ट बाजारातून आणायची गरज नाही,” असं ते ठामपणे सांगतात.

“जर तुम्ही ठरवलं की वर्षभर स्वतःच्या घराला लागणारा भाजीपाला स्वतःच पिकवायचा आहे, तर तुम्हाला झाडांच्या पिढ्यांची रचना आणि रोटेशन नीट ठरवावं लागतं,” असं सांगतात ते सांगतात. 

३०-४० फूट उंचीवरही उत्पादन यशस्वी !

त्यांची शेती ३० ते ४० फूट उंचीच्या टेरेसवर असूनही, त्यात भाजीपाला भरपूर आणि दर्जेदार येतो. “रोप लावल्यानंतर साधारण २०-२५ दिवसांनी त्याची व्यवस्थित फळधारणा सुरू होते,” असं ते सांगतात.

विशेष म्हणजे ते प्रत्येक झाडाचं नियोजन ‘रोटेशन’ पद्धतीने करतात. उदा. जर वांग्याचं झाड चार महिन्यांनी उपटायचं असेल, तर त्याची जागा रिकामी होण्याच्या अगोदर तीन महिन्यांपासून दुसऱ्या बॅचची रोपं ते तयार करून ठेवतात. यामुळे टेरेसवर भाजीपाल्याचं सतत उत्पादन सुरू राहतं. लागवड सुरू ठेवण्यासाठी काही ‘जलद उत्पादन’ देणारी पिकं अतिशय उपयुक्त ठरतात. यात- कोथिंबीर: लावल्यानंतर २२-२५ दिवसांत तयार होते, मेथी आणि पालक : २०-२५ दिवसांत कापायला तयार.

हे पिकं कमी वेळात मिळणारी असून, दर महिन्याला किंवा दोन आठवड्यांनी नवीन लावली तर वर्षभर सतत उपलब्ध राहतात.

शिफ्टिंग, नर्सरी आणि वेळेचं व्यवस्थापन –

“प्रत्येकवेळी स्वतः रोपं तयार करायला वेळ मिळेलच असं नाही. म्हणून मी कोल्हापूर जवळच्या चांगल्या नर्सरी मधून २०-२२ दिवसांची तयार रोपं घेतो. त्यांना लगेच गमले किंवा बादल्यांत शिफ्ट करता येतं,” असं ते सांगतात.

शेती करताना वेळेचं नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं असून, माळी सांगतात – “एकदा रोपं लावली की रोज अर्धा तास झाडांची काळजी घेतली, तरी चार-पाच माणसांचं कुटुंब पुरेल इतकं उत्पादन सहज मिळू शकतं.”

“कचरा हा समस्या नसून तो एक संधी आहे,” असं ठामपणे सांगतात दिलीप माळी, जे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या टेरेस शेतीत घरगुती कचऱ्यापासूनच कंपोस्ट खत तयार करून वापर करत आहेत. त्यांनी स्वतःच्या प्रयोगातून अनेक छोटे-मोठे कंपोस्टिंग मॉडेल तयार केले असून, त्याचा वापर आज अनेक कुटुंबं करत आहेत.

कंपोस्टिंगची घरगुती आरोग्यदायी पद्धत –

“जर तुम्ही पहिल्यांदाच कंपोस्टिंग करत असाल, तर लक्षात ठेवा – ५०% ओला कचरा (उदा. फळांच्या / भाज्यांच्या साली) आणि ५०% सुकं साहित्य (उदा. कोरडे पाने, पेपर कापड, आळशी, चहा पावडर) यांचं योग्य मिश्रण करा,” असं माळी सांगतात.

याशिवाय, आधीपासून तयार असलेलं थोडं कंपोस्ट जर तुम्ही नव्या कचऱ्यासोबत मिसळलं, तर कंपोस्टिंगची प्रक्रिया लवकर सुरू होते. “हे जुनं कंपोस्ट बुरशी किंवा जीवाणूंचा नैसर्गिक स्रोत असल्यामुळे ते नवीन ढिगात मिसळल्यावर प्रक्रिया वेगाने होते,” ते स्पष्ट करतात.

वेळेची गुंतवणूक –

दिलीप माळी यांनी कंपोस्टिंगसाठी वेगवेगळ्या प्लास्टिक बादल्या आणि कंटेनर यांचा उपयोग करून मल्टी-लेयर पद्धती विकसित केली आहे. एका कंटेनरमध्ये कचरा भरत असतानाच दुसऱ्या कंटेनरमध्ये कंपोस्ट तयार होत असतो. ही पद्धत रोजच्या वेळेने करता येते, असं ते सांगतात.

“तुम्ही दररोज थोडा कचरा, थोडं सुकं साहित्य आणि मातीसारखं जुनं कंपोस्ट टाकून ही प्रक्रिया नियमित केल्यास कोणतीही दुर्गंधी किंवा कीटक समस्या उद्भवत नाही,” असं त्यांचं निरीक्षण आहे.

कचरा व्यवस्थापनातून पोषणद्रव्य उत्पादन !

दिलीप माळी यांचं सेंद्रिय खत त्यांच्या झाडांसाठी पोषणद्रव्यांची खरी गरज आहे. “भाजीपाला करताना मानसिक तयारी फार महत्त्वाची आहे. घरच्या घरी भाजीपाला केल्याने तुमचं मानसिक समाधान वाढतं आणि निरोगी अन्न मिळतं,” असं दिलीप माळी म्हणतात.

ते सुचवतात की भाजीपाला करताना प्रत्येक झाडासाठी सहा बी (बीज) लागतात, त्यापैकी ७०% पिकं सफल होतात. उदा. माझ्याकडे आलेले भेंडीसाठी चे झाड ९ फुटांचे होते.

कोरोना काळातील संपर्क आणि अनुभव –

कोरोना काळात लोकांनी घरच्या आसपासच अन्न उत्पादनाकडे लक्ष दिले. दिलीप माळींचा संपर्क शंभर ते दीडशे लोकांशी होता आणि त्यांनी घरगुती भाजीपाल्याचा अनुभव वाटला. “लोकांना जेवढं दिलं, तेवढंच आम्हाला मिळालं,” असा त्यांचा अनुभव आहे.

शहरीकरणामुळे मोकळ्या जागा कमी होत असताना, दिलीप माळी यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी टेरेस शेती आणि घरगुती कंपोस्टिंगच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैली प्रस्थापित केली आहे. घरच्या कचऱ्यापासून खत तयार करून, केमिकल न वापरता भाजीपाला करता येतो, आणि मानसिक समाधानही मिळतं, याचा हा उत्तम अनुभव आहे.

त्यांनी काही रोगांबाबतही माहिती दिली, जसे की ‘ढब्बू मिरची वर लगेच रोग पडतो. त्यामुळे रोगाला लवकर बळी पडणार नाही, अशी रोपे घ्यावीत. तसेच चार पाच झाडांनंतर झेंडू चे झाड लावावे. यामुळे किड शोषली जाते.

भाजीपाल्यासाठी टेरेस शेतीची टिप्स –

दिलीप माळी म्हणतात, “घरच्या छोट्या जागेतही ४-५ लोकांच्या कुटुंबासाठी पुरेसा भाजीपाला होऊ शकतो. प्रत्येक रोपासाठी सहा बीज लावावेत, त्यातील ७०% पिकं यशस्वी होतात.” वांग्याचे झाड चार महिन्यांनी बदलावे, पण त्याआधीच दुसऱ्या झाडांची तयारी ठेवावी, म्हणजे सतत भाजीपाल्याचा नूतनीकरण होईल.

कोथिंबीर, मेथी, पालक सारख्या वेगाने तयार होणाऱ्या भाज्यांमुळे वर्षभर उत्पादन शक्य आहे.

दिलीप माळी म्हणतात, “शहरी भागात राहणाऱ्या लोकांमध्ये नैसर्गिक जीवनशैलीकडे आकर्षण वाढत आहे. टेरेस शेतीमुळे तुम्हाला घरच्या अंगणात हिरवाई मिळते, मानसिक समाधान मिळते आणि ताजी भाजी देखील.” कोल्हापूरमधील ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी टेरेस गार्डनिंगचे तंत्र शिकवले आहे.

यावेळी या कार्यक्रमात माहिती घेण्यासाठी अनेक निसर्ग प्रेमींनी उपस्थिती दर्शवली. तसेच टेरेसवरील गार्डन व नैसर्गिक शेती व फळबाग याविषयी शंकांचे समाधान करून घेतले.

शहरीकरणामुळे मोकळ्या जागा कमी होत असताना, दिलीप माळी यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी टेरेस शेती आणि घरगुती कंपोस्टिंगच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैली प्रस्थापित केली आहे. घरच्या कचऱ्यापासून खत तयार करून, केमिकल न वापरता भाजीपाला करता येतो, आणि मानसिक समाधानही मिळतं, याचा हा उत्तम अनुभव आहे. टेरेस शेतीला सुरुवात करणाऱ्यांसाठी दिलीप माळी यांचे मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल.

—————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here