The Election Commission has begun preparations for a special in-depth vetting campaign to remove unauthorized names from voter lists across the country and to remove foreign nationals.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशभरातील मतदार यादीतील अनधिकृत नावे वगळण्यासाठी आणि परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल फेरतपासणी (‘एसआयआर’ – Special Intensive Revision) मोहिमेची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना ( सीईओ ) ३० सप्टेंबर पर्यंत तयारी पूर्ण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही मोहीम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात देशव्यापी पातळीवर सुरू होण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला नवी दिल्लीमध्ये आयोजित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषदेत केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी पुढील १० ते १५ दिवसांत ‘एसआयआर’ सुरू करण्याची तयारी ठेवण्याचे सांगितले होते. मात्र, अधिक स्पष्टतेसाठी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सीईओंना आपापल्या राज्यातील आधीच्या ‘एसआयआर’नंतर प्रकाशित झालेल्या मतदार यादी तयार ठेवायला सांगण्यात आले आहे. बिहार मध्ये या वर्षाच्या अखेरीस तर आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.
काही राज्यांमध्ये आधीच ‘एसआयआर’ संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, दिल्ली सीईओंच्या संकेतस्थळावर २००८ ची तर उत्तराखंडच्या संकेतस्थळावर २००६ ची मतदारयादी उपलब्ध आहे. बिहारमध्ये २००३ च्या ‘एसआयआर’नंतर प्रकाशित मतदार यादी आगामी ‘एसआयआर’ साठी आधारभूत मानली जाणार आहे. बऱ्याच राज्यांमध्ये २००२ ते २००४ दरम्यान ‘एसआयआर’ मोहीम राबवण्यात आली होती, ज्यात नोंदणी झालेल्या मतदारांचा नव्या मतदार यादीमध्ये समावेश केला जाईल. प्रस्तावित देशव्यापी ‘एसआयआर’साठी २००२ ते २००४ दरम्यानची ‘एसआयआर’ची अखेरची तारीख आधारभूत ठरेल.
निवडणूक आयोगाने जनतेलाही आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी आणि मतदारयादी स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.