अनिल जासुद : कुरुंदवाड
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने शनिवार पासून कोयना धरणांतून करण्यात येणारा विसर्ग पुर्णतः बंद , तर वारणा धरणांतून करण्यात येणारा विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे . कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्ण उसंत घेतली आहे. यामुळे धरणांची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी सकाळी ९ वाजल्या पासून कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट बंद करण्यात आले आहेत. यामुळे धरणातून नदीपात्रात करण्यात येणारा विसर्ग पूर्णतः बंद झाला आहे.
वारणा धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढ कमी झाली आहे. परिणामी, जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवणे करिता धरणाच्या वक्र दरवाज्यातून सुरु असलेला १५९५ विसर्ग शनिवार सकाळी अकरा वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. आता यातून विद्युतगृहातील सुरु असलेला एकूण १६३० क्युसेक एवढाच विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. दरम्यान, तालुक्यात कृष्णेचे पाणी ओसरु लागल्याने शनिवारी सकाळी नृसिंहवाडी दत्त मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दत्त मंदिराला कृष्णेच्या पाण्याचा विळखा होता. मात्र, पूर ओसरु लागल्याने शनिवारी पहाटे चार वाजता श्रीं च्या पादुकावरील पाणी ओसरले. यामुळे सकाळ पासून मुख्य मंदिरात श्रीं ची सेवा, दुग्धाभिषेक, महापुजा, धुपदिप करण्यात येत आहे. श्रावण महिना व शनिवार असल्याने दत्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे.
या मोसमात नृसिंहवाडी मंदिराला २५ जून, ४ जुलै, १७ जुलै, २७ जुलै असे तब्बल चार वेळा कृष्णेचा वेढा पडला होता. यापैकी १७ जुलै वगळता तीन वेळा मंदिरात चढता दक्षिणद्वार सोहळा पार पडला आहे. तर १७ जुलै रोजी पाणी श्री दत्तप्रभुूच्या पादुकापर्यंत गेले. मात्र पाणी पातळीत वाढ न झाल्याने दक्षिणद्वार सोहळा न होताच पाणी ओसरले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी नृसिंहवाडी जवळ पाणी पातळी ३९ फूट ६ इंच होती, ती सांयकाळी पाच वाजता ३८ फूट झाली आहे.
राजापूर धरणांजवळ सकाळी पाणी पातळी ३० फूट १ इंच होती. ती सांयकाळी २८ फूट झाली आहे. आज सायंकाळी पाच वाजे पर्यंत कोयना धरणात ८६.७८ टीएमसी, वारणा धरणात २८.४२ टीएमसी, राधानगरी धरणांत ८.२६ टीएमसी तर अलमट्टी धरणात १०३.९१६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध नद्यावरील २९ बंधारे पाण्याखाली होती, यापैकी ३ बंधार्यावरील पाणी ओसरले असून सायंकाळी चार वाजेपर्यंत २६ बंधारे पाण्याखाली आहेत.
———————————————————————————————–