कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
‘आधी नंदापूर मग पंढरपूर’ अशी ओळख असलेल्या करवीर तालुक्यातील नंदवाळ येथे आषाढी एकादशीची यात्रा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडली. विठ्ठलनामाच्या गजरात संपूर्ण नंदवाळ गाव भक्तिरसात न्हालं होतं. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर पासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदवाळ गावात पौराणिक महत्त्व असलेल्या विठ्ठल-रुक्माईच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असतानाही भाविकांचा उत्साह कमालीचा होता. जवळपास दीड ते दोन लाख भाविकांनी विठ्ठल-रुक्माईचे दर्शन घेऊन पुण्य लाभ घेतला. जय जय विठ्ठल, हरि विठ्ठल या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.

आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी कोल्हापूरहून नंदवाळकडे येणाऱ्या दिंडी ने नगर प्रदक्षिणा केली. ही नगर प्रदक्षिणा पार पडल्यानंतर आज पहाटे आषाढी एकादशीच्या दिवशी दिंडी पुईखडी येथे पोहोचली. तेथे भव्य आणि दिव्य अशा रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या रिंगण सोहळ्यात परिसरातील विविध दिंड्यांनी सहभाग घेतला. हुपरी येथील मानाची दिंडी विशेष आकर्षण ठरली.
रिंगण सोहळ्यानंतर नंदवाळ मंदिर परिसरात विठ्ठल-रुक्माईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मंदिर परिसर तसेच संपूर्ण गाव भक्तिभावाने नटला होता. ठिकठिकाणी भजन, कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
पावसाने हजेरी लावली असली तरीही कोणतीही अडचण न घेता भाविकांनी विठ्ठलनामात तल्लीन होत यात्रा उत्साहात आणि भक्तीभावात साजरी केली. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेच्या यशस्वीतेसाठी गावकरी, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन यांनी विशेष मेहनत घेतली.
भाविकांच्या उत्साहाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने नंदवाळ गाव आज प्रत्यक्ष पंढरपूरच भासत होतं.
विशेष आकर्षण :
-
कोल्हापूरहून निघालेली दिंडी आणि भव्य रिंगण सोहळा पुईखडी येथे पार पडला.
-
हुपरी येथील मानाची दिंडीचा सहभाग
-
विठ्ठल-रुक्माईच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी
-
संपूर्ण परिसरात भक्तिरसपूर्ण वातावरण
-
पोलिसांचे बंदोबस्त
-
स्वयंसेवकांची मदत
-
वाहतूक व्यवस्थापन सुस्थितीत
पावसातही भक्तांचा उत्साह कायम :
-
संततधार असूनही दीड ते दोन लाख भाविकांची उपस्थिती
-
जय विठ्ठल-हरि विठ्ठलच्या गजरात संपूर्ण यात्रा संपन्न
———————————————————————————