मुंबई : विशेष प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केलं आहे. पटोले अध्यक्षांच्या आसनासमोर गेल्यामुळे हे निलंबन करण्यात आलं आहे. तर निलंबनानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून आज सभागृहात मोठ्या गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. काँग्रेस नेते आणि विदर्भातील आमदार नाना पटोले यांनी आज आक्रमक पवित्रा घेतल्यानं सभागृहात खळबळ उडाली
भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारने माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली. या पार्श्वभूमीवर नाना पटोले आक्रमक होत थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांच्या आक्रमक वर्तनावर आक्षेप घेत दिवसभरासाठी त्यांना निलंबित केलं. या संपूर्ण घटनेची माहिती शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली असून, विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या गोंधळामुळे पुढील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
———————————————————————————————–



