कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए नं जाहीर केलं आहे. भाजप अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षाच्या वरिष्ठांची भेट झालेली आहे, चर्चा सुरु आहेत, एनडीए उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल असे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्याशी फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात राजधानी नवी दिल्लीत घडामोडी वाढल्या आहेत. उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, अशीही माहिती आहे.
भाजपनं सीपी राधाकृष्णन यांचं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. भाजप आणि एनडीएची बैठक पार पडल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना फोन केल्याची माहिती आहे. राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या वतीनं ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून खर्गे यांना फोन केला. मल्लिकार्जून खरगे यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं सांगितल्याची माहिती आहे.
नड्डा यांनी सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न केला जाईल, असं म्हटलं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत २१ ऑगस्ट आहे, तर मतदानाची तारीख ९ सप्टेंबर आहे.
या निवडणुकीसंदर्भात जेपी नड्डा म्हणाले की आम्ही विरोधी पक्षांसोबत चर्चा करु, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणं आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी विरोधकांसोबत अगोदरच संपर्क केला आहे, आम्ही त्यांच्या संपर्कात राहू, एनडीएतील आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय, असं जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. एनडीएकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आहे. एनडीएचं संख्याबळ ४२७ इतकं आहे.
————————————————————————————–



