प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
महाराष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या मुंबई–पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा सुमारे १७० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
हायस्पीड रेल्वेमुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार असून, राज्यातील दोन प्रमुख आर्थिक व शैक्षणिक केंद्रांमधील दळणवळण सुलभ होईल. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापार आणि सेवा क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
याचबरोबर, पुणे–हैदराबाद दरम्यानचा सुमारे ५५० किलोमीटरचा प्रवास केवळ १ तास ५५ मिनिटांत पूर्ण होणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. देशभरात पर्यावरणपूरक आणि वेगवान प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सात हायस्पीड रेल कॉरिडॉर विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये मुंबई–पुणे हा महाराष्ट्रातील प्रमुख प्रस्तावित मार्ग आहे.
दरम्यान, अहमदाबाद–मुंबई हायस्पीड रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, त्यानंतर मुंबई–पुणे हा देशातील अत्यंत महत्त्वाच्या हायस्पीड रेल मार्गांपैकी एक ठरणार आहे.
अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी २.७७ लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी रेल्वे मंत्रालयाला २,७७,८३० कोटी रुपये भांडवली खर्चासाठी मंजूर करण्यात आले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे.
रेल्वेच्या एकूण खर्चातील मोठा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर खर्च होतो. २०२४–२५ मध्ये ५८,८४४ कोटी रुपये असलेला पेन्शन खर्च २०२६–२७ मध्ये ७४,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.






