पट्टणकोडोली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील अनंत विद्या मंदिर या शाळेने मात्र भाषा शिक्षणात नवा आयाम निर्माण केला आहे. येथे विद्यार्थ्यांना तब्बल आठ भाषा शिकवल्या जात आहेत. त्यात मर्यादित प्रादेशिक भाषांबरोबरच परदेशी भाषा आणि दुर्मिळ लिपींचाही समावेश आहे.
या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली ती शाळेचे संस्थापक शिरीष देसाई यांनी. त्यांच्या मनात “विद्यार्थी केवळ परीक्षांच्या चौकटीत न अडकता, जागतिक स्तरावर संवाद करू शकतील अशी तयारी शाळेतूनच झाली पाहिजे” हा विचार ठामपणे रुजला. हा विचार त्यांनी शिक्षकांपुढे मांडला, आणि विशेष म्हणजे, शिक्षकांनीही पूर्ण उत्साहाने त्याला पाठिंबा दिला. त्याचमुळे आज ही शाळा राज्यपातळीवर वेगळेपणाने ओळखली जाते आहे.
भाषा शिक्षणाची संकल्पना:
अनंत विद्या मंदिर मध्ये दरवर्षी ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी विविध भाषा आत्मसात करत आहेत. शाळेमध्ये शिक्षणासाठी कोणत्याही भाषेची सक्ती नाही, तर विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार भाषा शिकवली जाते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेने सर्वप्रथम शिक्षकांनाच त्या भाषा शिकवल्या त्यासाठी सर्व खर्च संस्थेने उचलला. तेच शिक्षक आता प्रेमाने आणि संवादात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
शिकवल्या जाणाऱ्या भाषा आणि लिपी:
-
मराठी, हिंदी, इंग्रजी : प्राथमिक स्तरावर सर्व विद्यार्थी शिकतात.
-
कन्नड भाषा : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना.
-
मोडी लिपी : पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी.
-
रशियन भाषा :सहावीच्या विद्यार्थ्यांना.
-
जर्मन आणि जापनीज भाषा : सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी.
पालक आणि समाजाचा मोलाचा पाठिंबा
या उपक्रमाच्या यशस्वितेमागे पालकांची सकारात्मक भूमिका आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यांचा मोठा वाटा आहे. “पालकांचा, शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा सहकार्यभाव असल्यामुळे आम्ही आठ भाषा शिकवू शकतो,” असं शाळेतील शिक्षक अभिमानाने सांगतात.
शैक्षणिक अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता, अनंत विद्या मंदिर चा उद्देश आहे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवणे. भाषिक संवाद हे २१ व्या शतकातले महत्त्वाचे कौशल्य असल्याची जाण ठेवत हा उपक्रम राबवला जातो आहे.
या उपक्रमामुळे पट्टणकोडोलीतील ‘अनंत विद्या मंदिर’ ही शाळा एक उदाहरण बनली आहे की, भाषाशिक्षण हे सक्तीने नव्हे, तर प्रेरणेने घडते. अशा प्रयोगशील शिक्षणपद्धतीमुळे राज्यभरातील इतर शाळांनीही भाषाशिक्षणाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहायला हवे.
———————————————————————————————–



