कोल्हापुरात बहुमजली पार्किंग सुरू

पहिल्याच दिवशी १८० वाहनांचे पार्किंग ; शुल्कावरून भाविकांत नाराजी

0
114
The multi-storey parking developed by the Kolhapur Municipal Corporation near Saraswati Talkies has been opened from Monday.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
नवरात्रोत्सवात अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने सरस्वती टॉकीज जवळ विकसित केलेले बहुमजली पार्किंग सोमवार पासून सुरू केले आहे. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या वाहनधारकांचा पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असला तरी, दर्शनासाठी दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागतत असल्याने पार्किंग शुल्क नाहक वाढत राहते. यावरून भाविकांत नाराजीची चर्चा जोरात सुरू आहे.

दर्शनरांगेत भाविकांना किमान दोन तास थांबावे लागत असल्याने चारचाकी वाहनधारकांना प्रति तास ४० रुपये या प्रमाणे किमान ८० रुपयांचे शुल्क मोजावे लागत आहे. दुचाकींसाठी मात्र मोफत सुविधा उपलब्ध आहे. सोमवारी दुपारी १२ पर्यंतच शंभरहून अधिक वाहनांनी या पार्किंगचा लाभ घेतला, तर सायंकाळी ६ पर्यंत १८० वाहनांचे पार्किंग झाले.

महानगरपालिका व वाहतूक विभागाने पार्किंगची माहिती शहरातील विविध ठिकाणी स्कॅनर व सूचनाफलकांद्वारे उपलब्ध करून दिल्याने बाहेरून आलेल्या भाविकांना थेट पार्किंगपर्यंत पोहोचणे सोयीचे ठरले. पार्किंग शुल्क वसुलीसाठी १० कर्मचारी आणि एक सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पार्किंगमध्ये एकूण ७५ चारचाकी व २५० दुचाकी वाहनांची सोय आहे. कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील ७९.९६ कोटींपैकी ५०.७० कोटी रुपये महापालिकेला मिळाले असून, त्यातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. आतापर्यंत २० कोटी रुपयांचा खर्च झाला असून उर्वरित काम सुरू आहे. यात पुढील टप्प्यात भक्तनिवास उभारण्याचे नियोजन आहे.

तळमजल्यावर भाविकांसाठी पाच स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत ; मात्र त्यांचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने ती वापरासाठी खुली करता आलेली नाहीत. तसेच, पार्किंग पैसे फास्टटॅग द्वारे ऑनलाईन वसुली करण्याची सोय असली तरी ती सोमवारी सुरू न झाल्याने पहिल्या दिवशी शुल्क ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे भाविकांना वाहनतळाचा दिलासा मिळाला असला तरी, दीर्घ दर्शनरांगा आणि वाढते पार्किंग शुल्क हे त्यांच्यासाठी आव्हान ठरत आहे.

————————————————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here