वॉरेन बफे आणि अझीम प्रेमजी यांचाही यादीत समावेश
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वेसर्वा आणि अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानींचा पहिल्यांदाच जाहीर झालेल्या टाईम शंभर परोपकारी व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत वॉरेन बफे आणि अझीम प्रेमजी यासारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे.
टाईम परोपकारी व्यक्तींच्या यादीत कोण-कोण?
दरम्यान, टाइम्स मासिकेच्या यादीत विप्रोचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी, उद्योजक निखिल कामथ आणि भारतीय वंशाचे अमेरिकन पत्रकार आनंद गिरिधरदास यांचाही समावेश आहे. त्याचवेळी, या यादीमध्ये डेव्हिड बेकहॅम, ओप्रा विन्फ्रे, डॉली पार्टन, जॅक मा, प्रिन्स विल्यम अशा जगातील २८ देशांतील अनेक लोकांचा समावेश आहे. टाईम मॅगझिनच्या पहिल्या परोपकारी यादीत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना त्यांच्या धर्मादाय कार्याद्वारे लाखो लोकांना सक्षम बनवल्याबद्दल २०२५ च्या सर्वात प्रभावशाली दानशूरांच्या यादीत पहिल्यांदाच स्थान देण्यात आले आहे.
भारतातील या अब्जाधीश जोडप्याने २०२४ मध्ये ४०७ कोटी रुपये (सुमारे ४८ दशलक्ष डॉलर्स) दान केले आणि भारतातील सर्वात मोठ्या दानशूर बनले. मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार अंबानी कुटुंबाने शिष्यवृत्ती, शालेय पायाभूत सुविधा, करिअर कौशल्ये बळकट करणे, ग्रामीण शेतकरी समुदायांना मदत करणे, जलसंवर्धन, वैद्यकीय मदत आणि बऱ्याच अनेक कारणांसाठी निधी दिला. मुकेश अंबानींची एकूण नेट वर्थ अंदाजे ११० अब्ज डॉलर्स असून त्यांच्या पत्नी नीता अंबानी मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाच्या मालकिणी देखील असून खेळाडूंच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दलही त्यांना गौरवण्यात आले. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी एकदा म्हणाले होते की त्यांचे वडील कामाच्या बाबतीत खूप समर्पित आहेत. आकाश म्हणाले होते की, “आजही तो रात्री २ वाजेपर्यंत प्रत्येक ई-मेल तपासतात.”
पहिल्यांदाच प्रसिद्ध झाली ही यादी
टाईम परोपकार यादीत इतर काही भारतीयांची नावे आहेत. यामध्ये विप्रोचे माजी अध्यक्ष अजी प्रेमजी, उद्योजक निखिल कामथ आणि भारतीय वंशाचे अमेरिकन पत्रकार आनंद गिरिधरदास यांचा समावेश आहे. टाईम मासिकाने पहिल्यांदाच धर्मादाय कार्याचा सन्मान करण्यासाठी ही यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या आयेशा जावेद म्हणाल्या, “या महत्त्वाच्या वेळी ही यादी उदार देणगीदार आणि फाउंडेशन आणि बिगर-नफा संस्थांचे नेते ज्या समुदायांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना पैसे कसे देत आहेत हे अधोरेखित करते.”



