प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने बस तिकीट व विविध सामाजिक सवलतींसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेशी करार करण्यात आला असून, सर्व आगारांमध्ये लवकरच नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी आदी सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. मात्र, काही ठिकाणी खोट्या ओळखपत्रांचा वापर करून सवलतींचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात येत आहे.
या कार्डमुळे सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार शक्य होणार आहेत.
कार्ड मिळविण्याची प्रक्रिया :
एसटीने राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत ज्येष्ठ नागरिक व महिला एजंट नियुक्त केले आहेत. बसस्थानकांवरच नोंदणी होणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही याचा लाभ मिळणार आहे. नवीन कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार असून, जुने कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड दिले जाईल. कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. रिचार्ज ५० रुपयांच्या पटीत करता येईल. ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप किंवा नियुक्त एजंटकडून रिचार्ज सुविधा उपलब्ध असेल.
कोणाला मिळणार कार्ड?
शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिलांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांकाशी जोडलेले विशेष कार्ड दिले जाईल. तसेच स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत कार्ड वितरण केले जाईल.
“एसटीचा हा निर्णय म्हणजे पारंपरिक व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. हातात तिकीट आणि सुट्या पैशांची चिंता आता संपणार असून, स्मार्ट कार्डमुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होईल,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.






