कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोकणातील लोक गणेशोत्सव कधी चुकवत नाहीत. वर्षातून एकदा गणेशोत्सवाच्या निमित्त कोकणवासीय गावात एकत्र येतात. म्हणूनच वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. सध्या कोकणात जाणाऱ्या ट्रेन, बस यांचं बुकिंग फूल झालं असल्याने चाकरमान्यांसमोर चिंता आहे. गावी नेमकं जायचं तरी कसं असा प्रश्न कोकणवासियांना सतावत आहे. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३६७ अधिक फेऱ्या होतील अशी योजना आखली असल्याचं त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना जास्त गाड्या सोडण्याची विनंती केली होती. त्यांनी पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी मागील वर्षीपेक्षा जास्त ३६७ फेऱ्यांची योजना आखली आहे. मागच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. त्यामुळे मुंबई आणि इतर भागातील लोकांना रेल्वेची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यासाठी मी त्यांचे आणि पंतप्रधानांचे आभार मानतो. चाकरमानी आणि कोकणात राहणारे मुंबईकर यांच्यासाठी ही मोठी व्यवस्था केली आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेसची घोषणा
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. यंदा कोकणवासीयांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत. अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
कोकणवासीय गणेशभक्तांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस विशेष रेल्वे सेवा गेली १२ वर्षे अविरतपणे नागरिकांच्या सेवेत आहे. परंतु यंदा हि सेवा स्पेशल असून दोन ट्रेन नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार आहेत. यावर्षी कोकणवासीयांच्या सेवेसाठी २ विशेष ट्रेन सोडणार असून सर्व प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
दिनांक २३ व २४ ऑगस्ट अशा दोन दिवशी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या रेल्वे सुटणार आहेत. याचे तिकीट वाटप १८ ऑगस्ट पासून सुरु करण्यात आले आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे.
शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळ ला थांबेल, या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. तसेच रविवार २४ ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी व कणकवली येथे थांबेल. या डबल धमाका स्पेशल मोदी एक्स्प्रेस चा लाभ सर्व कोकणवासीयांना घ्यावा असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
————————————————————————————————