कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवार व रविवारच्या सलग सुट्टीची पर्वणी साधत कोल्हापुरात भाविक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली. अंबाबाई मंदिरात दोन दिवसांत तब्बल १ लाख ४ हजार २१९ भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे. शनिवारी ३७,०६७ आणि रविवारी ६७,१५२ भाविक अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले.
श्रावण महिन्यात धार्मिक पर्यटनाला विशेष प्राधान्य दिलं जातं. अंबाबाई हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असल्यामुळे पहिल्याच आठवड्यात भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. कोल्हापूर शहरातील धार्मिक स्थळांबरोबरच पन्हाळा, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, जोतिबा डोंगर यांसारख्या पर्यटनस्थळांनाही पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या. बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी चढाओढ दिसून आली.
दरम्यान, आज श्रावण सोमवारी अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. या विशेष योगामुळे दूरदूरून भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत आहेत.
तसेच जिल्ह्यातील कणेरी मठ, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, सातेरी देवी मंदिर, तसेच इतर प्रसिद्ध महादेव मंदिरे या ठिकाणी ही सोमवारी भाविकांची मोठी उपस्थिती राहणार आहे. अनेक भाविकांनी सोमवारी सकाळपासूनच दर्शनासाठी नियोजन केले आहे.
कोल्हापुरात श्रावणातील धार्मिक पर्यटनाचा उत्साह चांगलाच वाढला असून, प्रशासन व देवस्थान समितीने गर्दीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती व्यवस्था केली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
———————————————————————————–