मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
यंदा मान्सूनने दमदार सुरुवात केली असून, राज्यात आणि देशात पावसाने सरासरी ओलांडली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काळातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारे वातावरण निर्माण झाले आहे.
मे महिन्यातच राज्यात चांगल्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, त्यानंतर राज्यातील बहुतांश भागांत दमदार पाऊस झाला. विशेषत: पुणे, मुंबईसह राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागांत जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
मुंबई-पुण्यात सरासरी ओलांडली
मुंबईत जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत ४९.७ मिलिमीटर अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे. तर, पुण्यात सरासरी १७३ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत तब्बल २६३ मिलिमीटर पाऊस २९ जूनपर्यंत नोंदला गेला आहे.
जुलै महिन्यातही जोर कायम राहणार
हवामान विभागाने आधीच अंदाज व्यक्त केला होता की, यंदा राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार आहे. आता विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, जुलै महिन्यात राज्यात आणि देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार आहे.
विशेषत: ५ जुलैनंतर पाऊस अधिक सक्रीय होणार असून, शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे खरीप पेरण्यांचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
देशभरातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस
फक्त राज्यातच नाही तर देशभरातही यंदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर शेतीसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.
पावसाचा जोर लक्षात घेता संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याचे प्रकार आणि अन्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------






