कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यंदाचा मान्सून वाऱ्याच्या वेगासह अपेक्षे पेक्षा लवकर भारतात दाखल झाला आहे. आज २४ मे रोजीच , म्हणजेच अपेक्षित वेळे पेक्षा एक दिवस आणि सरासरी वेळेपेक्षा तब्बल आठ दिवस आधी, मान्सूनने केरळच्या किनारपट्टीवर पाऊल ठेवले. त्याचबरोबर तमिळनाडूचा बहुतांश भाग आणि कर्नाटकातील काही भागांपर्यंत त्याचा विस्तार झाला असून, यामुळे शेतीसह अनेक क्षेत्रांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
मान्सूनची आगेकूच –
मान्सूनने दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार झेप घेतली आहे. संपूर्ण केरळ राज्य, तमिळनाडूचा बहुतांश भाग, कर्नाटकाचा काही भाग, तसेच दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग आणि मिझोरामचा काही भाग याठिकाणीही मान्सूनने पाय ठेवले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
आज मान्सूनची हद्द कर्नाटकातील करवार व सिमोगा, तमिळनाडूतील धर्मापुरी व चेन्नई, तसेच मिझोराममधील सैहा या भागांपर्यंत पोहोचली आहे. सध्या वातावरण मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत पोषक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात प्रवेश करेल. त्याचबरोबर तो आंध्र प्रदेशात, उर्वरित तमिळनाडूमध्ये, कर्नाटकातील शिल्लक भागात, ईशान्य भारतातील काही राज्यांत, पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागात आणि सिक्कीममध्येही दाखल होणार आहे.
समुद्रातील हालचाल वेगात –
मान्सून याच कालावधीत मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत देखील प्रवेश करेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात मान्सूनच्या वेगवान आगमनाने शेतकरी आणि नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. मान्सूनच्या वेळेपूर्वी आगमनामुळे महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला गती मिळेल, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
——————————————————————————–



