नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेतील मोठा घोटाळा उघड केला. त्यांनी स्पष्ट केलं की हा काही “हायड्रोजन बॉम्ब” नाही, मात्र लवकरच तो पडेल. “आज मी देशातील तरुणांसमोर उदाहरणं ठेवतो आहे. मत चोरी कशी होते, निवडणुकीत कशी गडबड केली जाते हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे,” असं गांधी म्हणाले.
कर्नाटकात नावं वगळली, महाराष्ट्रात नावं जोडली
कर्नाटकातील अलंद मतदारसंघात तब्बल ६०१८ मतदारांची नावं यादीतून वगळली गेल्याचा दावा राहुल गांधींनी केला. “ २०२३ च्या निवडणुकीत ही संख्या याहून अधिक आहे, मात्र योगायोगाने काही जण पकडले गेले. एका बूथ लेव्हल अधिकाऱ्याला त्याच्या स्वतःच्या काकाचे नाव वगळल्याचं आढळलं. चौकशी केल्यावर समजलं की ना काकांनी अर्ज केला होता, ना शेजाऱ्यांनी. म्हणजेच कोणत्या तरी बाहेरील शक्तीनं संपूर्ण प्रक्रिया हायजॅक केली,” असे ते म्हणाले.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघात ६८५० मतदारांची नावं यादीत जोडण्यात आली, पण या मतदारांचा कोणताही थांगपत्ता नाही, असा धक्कादायक दावा त्यांनी केला.
कॉल सेंटर व अत्याधुनिक सॉफ्टवेअरवर संशय
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “ यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरलं गेलं. अर्ज ३४ सेकंदांत भरले गेले. एका कॉल सेंटरमधून हे सर्व ऑपरेशन करण्यात आलं. काँग्रेसच्या हार्डकोअर बूथवरील मतं जाणून बुजून डिलीट झाली आहेत.”
या प्रकरणाची चौकशी कर्नाटक सीआयडीनं गेल्या १८ महिन्यांत १८ पत्रांद्वारे केली असून निवडणूक आयोगाला आयपी अॅड्रेस, डिव्हाईस यांसारखी माहिती मागितली आहे. मात्र, आयोगाकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही, असा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला.
“मी कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाही. माझं देशावर प्रेम आहे. निर्णय घेण्याची जबाबदारी तुमची आहे,” असं सांगत राहुल गांधींनी पत्रकार परिषद संपवली.
————————————————————————————————–