शांघाय : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
चीनमध्ये सुरू असलेल्या ३१ व्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. या संमेलनात मोदी यांनी पाकिस्तान, दहशतवाद आणि चीनच्या दुटप्पी भूमिकेवर परखड भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधले.
बैठकीसाठी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एकाच गाडीतून रवाना झाले. अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदीबाबत दबाव टाकत असताना, मोदी–पुतिन यांचा एकत्र प्रवास आंतरराष्ट्रीय पटलावर चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेने भारत-रशिया संबंधांची जवळीक अधोरेखित झाली.
संमेलनादरम्यान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या कारवायांवर थेट टीका केली. त्यांनी पहलगाममधील हल्ल्याचा कडक शब्दात निषेध करत म्हटले की, “ मी सर्व मित्रदेशांचे आभार मानतो, ज्यांनी या हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा दिला. पण एक प्रश्न राहतो. काही देश अजूनही दहशतवादाला थेट समर्थन देतात. हे आपण मान्य करणार का ? दहशतवादाविरोधात आपणा सर्वांनी एकत्र उभे राहायला हवे.”
यावेळी मोदी यांनी सार्वभौमत्वाच्या उल्लंघनावरही भाष्य केले. “ जेव्हा एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन होते, तेव्हा कोणतेही नाते विश्वासार्ह राहत नाही,” असे म्हणत त्यांनी थेट CPEC ( चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर ) वर अप्रत्यक्ष निशाणा साधला. नाव न घेता त्यांनी या प्रकल्पावर भारताची ठाम नाराजी व्यक्त केली.
दहशतवादाला पोषक वातावरण देणाऱ्यांना इशारा देताना मोदी म्हणाले की, दहशतवादाला प्रोत्साहन दिल्यास कोणताही देश किंवा समाज सुरक्षित राहणार नाही. त्याचबरोबर त्यांनी चीनलाही थेट संदेश दिला की, दहशतवादाबाबत दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. “ भारताबाबत चीनचे वागणे नेहमी वेगळे दिसते, त्यामुळे विश्वास उडतो,” असे ते म्हणाले.
या परखड वक्तव्यामुळे एससीओ शिखर संमेलनातील समीकरणे बदलताना दिसत आहेत. पाकिस्तानवर अप्रत्यक्ष हल्ला, CPEC विरोध, तसेच चीनच्या दहशतवादा बाबतच्या भूमिकेवर थेट सुनावणी मोदींच्या या ठाम भूमिकेने भारताची जागतिक प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.
———————————————————————————————