कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आज सकाळपासून कोल्हापुरात ढगाळ वातावरण आहे. अकरा वाजता झिरमट पाऊस झाला. गेले कित्येक दिवस पाऊस उघडला असून आता हळू हळू पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने आज १३ उद्या १४ ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळमध्ये आज व उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्येही अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये १३ ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस असणार आहे. तर पुण्यात मात्र हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत, अंदमान आणि निकोबार बेटे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. उत्तर हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि किनारी आंध्र प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. झारखंड आणि उत्तर मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
————————————————————————————————