नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गेल्या काही वर्षांत मोबाईल सेवा कंपन्यांनी रिचार्ज दरात लक्षणीय वाढ केली असून, आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरु केली आहे. एका बाजूला रिचार्ज दरात १० ते १२ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला कंपन्या डेटा लिमिट ही कमी करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, कंपन्या ग्राहकांना लवकरच अशा योजनेत अडकवू शकतात, ज्यात कमी डेटा मिळेल आणि वारंवार रिचार्ज करावा लागेल.
कंपन्यांचा डेटा गेमप्लान
प्रथम कमी किंमतीचे डेटा पॅक आणायचे, ग्राहकांना त्याची सवय लावायची, आणि नंतर हेच पॅक महाग करून जास्त नफा मिळवायचा. अशा प्रकारे ग्राहक नकळतपणे एका सवयीच्या जाळ्यात अडकतात आणि अखेर कंपन्यांना फायदा मिळतो. अशी याच्या मागे कंपन्यांची स्पष्ट रणनीती आहे.
युजर्समध्ये विक्रमी वाढ
मे महिन्यात एकट्या मोबाईल कंपन्यांचे ७४ लाख अॅक्टीव्ह युजर्स वाढले, आणि ही गेल्या २९ महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे सध्या देशातील एकूण अॅक्टीव्ह मोबाईल युजर्सची संख्या १०८ कोटींवर पोहोचली आहे.
गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत जवळपास २.१ कोटी युजर्सने सेवा बंद केली होती, पण गेल्या पाच महिन्यांपासून पुन्हा युजर्सची संख्या वाढू लागली आहे.
जिओ आणि एअरटेलची आघाडी
या वाढत्या युजर्समध्ये जिओने सर्वाधिक म्हणजे ५५ लाख युजर्स जोडले असून, सध्या त्यांचा मोबाईल बाजारातील वाटा ५३ टक्के झाला आहे. त्याच वेळी एअरटेलने १३ लाख युजर्स जोडले असून त्यांचा हिस्सा आता ३६ टक्के इतका आहे.
ग्राहकांचा पर्याय नंबर पोर्टिंग ?
या वाढत्या दरवाढीच्या आणि डेटाच्या मर्यादा कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर, मोबाईल नंबर पोर्टबिलिटी (MNP) हा पर्याय पुन्हा चर्चेत आला आहे. ग्राहक पुन्हा एकदा सेवा आणि दर यांचा विचार करून दुसऱ्या नेटवर्ककडे वळण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
मोबाईल सेवा कंपन्या एका बाजूने दर वाढवत आहेत, तर दुसऱ्या बाजूने डेटा मर्यादा कमी करत आहेत. यामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. डेटा ही आधुनिक युगातली ‘गरज’ बनले असताना, तोच टप्प्याटप्प्याने महाग केला जाणार असल्यास ग्राहकांसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. सतत वाढणाऱ्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांनी आता स्वतःच्या वापराची चिकित्सा करून, माफक दरात सर्वोत्तम सेवा देणाऱ्या पर्यायांचा विचार करणे अधिक आवश्यक झाले आहे.
————————————————————————————————=



