
चंदगड : प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावातील विठ्ठलभक्त वारकरी मंडळींना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी पंढरपूर येथे सदिच्छा भेट दिली.
आमदार पाटील यांनी वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधला. वारकऱ्यांच्या भक्तिभाव, निष्ठा आणि त्यागमय सेवाभावाचे त्यांनी मन:पूर्वक कौतुक केले. “वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यांच्या नित्यनेमाने वारीतल्या सहभागामुळेच आपल्या संस्कृतीचं दर्शन पिढ्यान्-पिढ्यांना घडत आहे,” असे गौरवोद्गार आमदार पाटील यांनी यावेळी काढले.
आमदार पाटील यांनी केवळ कुद्रेमानी येथीलच नव्हे, तर चंदगड तालुक्यातील इतर वारकरी दिंड्यांनाही सदिच्छा भेटी देत आपला सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक ऋणानुबंध अधिक दृढ केला. त्यांच्या या भेटीमुळे वारकरी बांधवांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारकऱ्यांच्या माध्यमातून संस्कृतीचा आणि भक्तीपरंपरेचा जागर होत असून, या परंपरेच्या जतनासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
————————————————————————————





