मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
मुसळधार पावसाने मुंबईसह राज्याला झोडपायला सुरुवात केली असताना याचा सर्वाधिक फटका राज्य प्रशासनाचा केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयाला बसला आहे. पहिल्याच पावसाच्या फटक्यात मंत्रालयात केवळ ३० टक्के कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित राहिले. उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही दुपारी साडेतीन वाजता सोडून देण्यात आले.
राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसाने सोमवारी सकाळी मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत करून टाकली. रस्त्यावर विविध ठिकाणी पाणी साचले होते तर मध्य आणि पश्चिम रेल्वेलाही त्याचा फटका बसला. मध्य रेल्वे वर वाहतूक विस्कळीत झाल्याने एक ते दोन तास उशिरा गाड्या धावत होत्या. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी कर्मचाऱ्यांना दमछाक करावी लागत होती. सकाळी निघालेले कर्मचारी दुपारी बारा एक वाजेपर्यंत कसेबसे कार्यालयात पोहोचले.
मंत्रालयात ३० टक्के उपस्थिती –
पावसाचा फटका बसल्याने मंत्रालयाची उपस्थिती अत्यंत कमी होती. मंत्रालयातील ७६७८ कर्मचाऱ्यांपैकी बायोमेट्रिक वर केवळ २६४९ म्हणजे ३० % कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवली गेली होती. यामध्ये सर्वाधिक उपस्थिती जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांची ४९ % होती तर सर्वात कमी उपस्थिती गृहनिर्माण विभागातील कर्मचाऱ्यांची १० % इतकी होती. याशिवाय वित्त विभाग ३१ टक्के कृषी विभाग २३ टक्के उच्च आणि तंत्रशिक्षण ३१ टक्के गृह विभाग ३३ % राजे शिष्टाचार २७ % वैद्यकीय शिक्षण २५ % मराठी भाषा विभाग २२ टक्के सार्वजनिक बांधकाम विभाग ३९ टक्के नगर विकास विभाग २६ टक्के आणि स्वयंरोजगार विभागाचे २९ टक्के उपस्थिती नोंदवली गेली होती.
महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचे आदेश
दरम्यान, दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने मंत्रालयात उपस्थित राहिलेल्या महिला कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांनी दुपारी साडेतीन नंतर घरी जाण्याचे आदेश दिले. तसेच त्यानंतर चार वाजता मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
——————————————————————————————-



