कोल्हापूर शहरासाठी असलेल्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक
कोल्हापर : प्रसारमाध्यम न्यूज
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर शहरासाठी असलेल्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला.
कोल्हापूर महापालिकेंतर्गत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेच्या तक्रारीबाबत महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या समवेत चर्चा झाली. कोल्हापूर वासियांना दोन वेळचे स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी महापालिकेने तातडीने अडचणी दूर करून योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. हे काम करणाऱ्या कन्सल्टंट तसेच पुरवठादारानेही याबाबत चांगल्या पद्धतीने अभ्यास करून वारंवार येणाऱ्या त्रुटींचा विचार करून एक चांगला पर्याय शोधून योजना अखंडित सुरू राहण्यासाठी काय काय करता येईल याबाबतही नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत पुरवठा करणे, बी बियाणे यांचा पुरवठा करणे तसेच या अनुषंगिक प्रश्नांबाबतचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समवेत झाला. लिंकिंगचा प्रश्न, खतांचा पुरेसा पुरवठा आणि बी बियाणांचा पुरवठा याबाबत यावेळी चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील विविध पुरवठादारांसह कृषी अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी स्तरावर लावून त्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढावा असे निर्देश त्यांनी दिले.
कागल नगरपरिषदेतील २००३ पासून सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या देय रकमेबाबत मंत्री महोदयांनी नगरपालिका फंडातील मर्यादांचा विचार करता याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर पुढील आठवड्यात बैठक लावावी लागेल अशी माहिती दिली.
कागल शहरातील म्हाडा गृहप्रकल्पाबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली. याबाबत म्हाडा प्रशासन व संबंधित सदनिका धारक उपस्थित होते. याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी मुंबई येथील वरिष्ठांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबत राज्यस्तरावर बैठक लावून येत्या आठ दिवसात प्रश्न मार्गी लावणार अशी ग्वाही त्यांनी सदनिका धारकांना दिली.
कागल एमआयडीसी येथील ओसवाल एफएम टेक्स्टाईल एक वर्षापासून बंद असल्या कारणाने तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आयुक्त कामगार पुणे, सहाय्यक, आयुक्त कामगार इचलकरंजी यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी तेथील काम करीत असलेल्या कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कामगारांच्या मागणीनुसार त्यांच्या देय रकमा तातडीने मिळाव्यात यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. यानंतर येत्या दोन दिवसात संबंधित बँका, कंपनीचे मालक व कामगार विभागाने एकत्रित बैठक लावून यावर निश्चित असा तोडगा काढावा. त्यानंतर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नियमाप्रमाणे देय रकमांचा तपशील एकमेकांना देऊन याबाबत अंतिम निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करावी अशा सूचनाही या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.



