कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्य लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांप्रमाणेच आता सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठीही किमान पसेंटाइल (Percentile) आधारित आर्हतामान लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाकडून नुकतेच एक परिपत्रक जाहीर करण्यात आले असून, या नव्या निकषाची अंमलबजावणी येणाऱ्या चाळणी परीक्षांपासून केली जाणार आहे.
या निर्णयामुळे सरळ सेवा भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी फक्त स्पर्धा परीक्षांसाठीच किमान पसेंटाइलची अट लागू होती. मात्र, आता सरळ सेवा भरतीच्या प्रक्रियेतही पात्र उमेदवार ठरवताना किमान पसेंटाइल अटींचा विचार केला जाईल.
राज्य सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी एमपीएससी दरवर्षी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवते. यामध्ये मोठ्या संख्येने अर्ज येतात आणि अनेक वेळा अपारंपरिक प्रमाणावर स्पर्धा होते. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचे उमेदवार निवडण्यासाठी आयोगाने ही सुधारणा केल्याचे सांगण्यात आले आहे.
संबंधित परीक्षार्थी आणि उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय होणार बदल ?
पसेंटेज प्रणालीमध्ये परीक्षार्थी उमेदवाराला १०० पैकी किती गुण मिळाले हे दर्शविले जाते. परंतु, पसेंटाइल पद्धती यापेक्षा वेगळी आहे. यामध्ये परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या गुणानुसार एका विशिष्ट फार्म्युलाने एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येवरून तुमचे त्यातील स्थान निश्चित केले जाते. दिलेल्या मूल्याच्या खालील मूल्यांची संख्या भागिले एकूण मूल्यांची संख्या गुणिले १०० या सूत्रानुसार पसेंटाइल काढले जाते. ही गुणांकन पद्धत आता सरळ सेवा भरतीदरम्यान वापरली जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी मोठा बदल होणार आहे. स्पर्धा परीक्षांप्रमाणेच आता सरळ सेवा भरतीसाठी किमान पर्सेंटाईल पात्रता लागू केली जाईल. यापुढे, भरती प्रक्रियेतील चाळणी परीक्षांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांकन पद्धतीत बदल होतील. विविध शिफ्टमध्ये परीक्षा होत असल्याने, प्रश्नांची काठीण्य पातळी बदलते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.