नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आज समाप्त झाला. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाच्या सुरक्षेची भक्कम ढाल ठरलेली मिग-२१ लढाऊ विमाने आज औपचारिकपणे सेवानिवृत्त करण्यात आली. चंडीगढ येथील हवाई दलाच्या तळावर एका भावुक आणि गौरवशाली कार्यक्रमात ‘पँथर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २३ स्क्वाड्रन तुकडीच्या अखत्यारितील या लढाऊ विमानांनी अखेरचा उड्डाणानंतर निरोप घेतला. मिग 21 च्या निवृत्तीनंतर त्याची जागा तेजस LCA मार्क 1A घेणार आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त वायू दलाचे अधिकारी, तसेच लष्करी आणि नागरी प्रतिष्ठित पाहुण्यांची उपस्थिती होती. मिग-21 च्या सेवेचा गौरव करण्यासाठी विशेष हवाई संचलन, स्मरणिकांचे प्रकाशन आणि पूर्ववैमानिकांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतासाठी मिग-21चे योगदान
मिग-21 हे लढाऊ विमान १९६३ मध्ये भारतीय वायुदलाच्या सेवेत रुजू झालं. हे देशाच्या संरक्षण यंत्रणेत रुजू झालेलं पहिलं सुपरसोनिक जेट होतं. म्हणजेच आवाजाच्या वेगाहूनही अधिक वेगानं उड्डाण करण्याची क्षमता या विमानात होती. काळानुरूप मिग 21 मध्ये काही बदल करण्यात आले आणि मिग 21 बायसन नव्या प्रणालीसह सेवेत आणण्यात आलं. ज्यामध्ये नवं रडार, मिसाईल, हेल्मेट माऊंटेड साईट जोडण्यात आल्या होत्या.
सोव्हिएत रशियाने विकसित केलेले मिग-21 हे विमाने १९६३ साली भारतीय वायुदलात सामील झाली होती. त्यानंतर १९६५, १९७१ आणि १९९९ मधील कारगिल युद्धात मिग-21 ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत वेगवान आणि चपळ असलेले हे विमान भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचा एक मूलभूत भाग ठरले होते.
‘पँथर्स’चा गौरवशाली वारसा
२३ स्क्वाड्रन ही एक प्रतिष्ठित तुकडी असून, अनेक दशकांपासून मिग-21 ची धुरा तिच्या खांद्यावर होती. या तुकडीने आपल्या शौर्य, शिस्त आणि कामगिरीद्वारे आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. ‘पँथर्स’चा वारसा मिग-21 च्या निरोपानंतरही पुढील तंत्रज्ञानासोबत सुरू राहणार आहे.
——————————————————————–