भारतीय हवाई दलाच्या शौर्यपूर्ण इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या मिग-21 लढाऊ विमानाने उद्या – २६ सप्टेंबरला अंतिम झेप घेणार आहे. तब्बल ६२ वर्षांच्या अभूतपूर्व सेवेनंतर मिग-21 ची सेवा अधिकृतपणे संपुष्टात येत असून, यानिमित्ताने चंदीगड एअर फोर्स स्टेशनवर एक भव्य आणि भावुक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याच तळावर १९६३ मध्ये मिग-21 विमानांचा भारतीय हवाई दलात पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता.
या सुपरसॉनिक जेटच्या निरोप समारंभाच्या औपचारिक फ्लाय-पास्टमध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा सहभागी होणार आहेत. त्या आयएएफच्या निवडक महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक असून, मिग-21 मधून अंतिम उड्डाण करणाऱ्या शेवटच्या महिला पायलट ठरण्याचा मान त्यांना मिळणार आहे. या समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील आणि या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून ते एक स्मारक टपाल तिकीट देखील प्रकाशित करतील.
प्रिया शर्मा :
– प्रिया शर्मा या २०१८ मध्ये डुंडीगल येथील एअर फोर्स ॲकॅडमीतून उत्तीर्ण झाल्या. – त्या आयएएफच्या सातव्या महिला लढाऊ पायलट आहेत. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते त्यांना फ्लाइंग ऑफिसर म्हणून कमिशन देण्यात आले होते. – त्यांच्या बॅचमध्ये त्या एकमेव महिला लढाऊ वैमानिक होत्या. – राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्याच्या मूळ रहिवासी असलेल्या प्रिया यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हवाई दलात प्रवेश केला. – या वर्षाच्या सुरुवातीला बिकानेर एअर फोर्स स्टेशनवरील निरोप उड्डाणांमध्ये सहभागी होऊन त्यांनी मिग-21 च्या वारसामध्ये आपले नाव नोंदवले आहे.
निवृत्ती समारंभ कसा असेल :
– उद्या होणाऱ्या समारंभात मिग-21 ची शेवटची ऑपरेशनल स्क्वॉड्रन – नंबर २३ पँथर्स (Number 23 Panthers) – वॉटर कॅनन सॅल्यूट देणार आहेत आणि औपचारिक फॉर्मेशन्स सादर करेल. – हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग हे ‘बादल 3’ (Badal 3) या कॉल साइनसह मिग-21 चे अंतिम उड्डाण करतील. – नंबर २३ स्क्वॉड्रनची विमाने बादल आणि पॅंथर फॉर्मेशन्समध्ये फ्लायपास्ट करतील. – ‘आकाश गंगा’ स्कायडायव्हिंग टीम ८ हजार फुटांवरून उडी मारून या कार्यक्रमाची सुरुवात करेल. – सूर्य किरण एअरोबॅटिक टीम चित्तथरारक कवायतींचे प्रदर्शन करेल. – विमानांना त्यांच्या अंतिम लँडिंगनंतर वॉटर कॅनन सॅल्यूट दिला जाईल.