आजच्या या आयटी-माहिती तंत्रज्ञानाच्या प्रचंड वेगाने वाढणा-या व तेवढ्याच झपाट्याने बदलणाऱ्या युगाचा बेस म्हणजे संगणक व मायक्रोसॉफ्टच्या विंडोज! माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडवून आणणारी मायक्रोसॉफ्ट कंपनी व त्याचे संस्थापक बिल गेट्स यांचे नाव आता घरोघरी पोहोचले आहे आणि हा हा म्हणता मायक्रोसॉफ्ट 50 वर्षांची झाली आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज सिस्टीम व PC म्हणजे पर्सनल काॅम्प्युटर एकमेकात मिसळून गेले आहेत. करोडो ऑफिसेस एमएस ऑफिस (MS Office) वर विसंबून आहेत.
साॅफ्टवेअर मधिल मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज हे साॅफ्टवेअर क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध नाव म्हणून नावाजण्यास कुणाची हरकत नसावी. मायक्रोसॉफ्ट साॅफ्टवेअर, हार्डवेअर मधील त्यांच्या प्रॉडक्ट्स व सेवांची ‘रेंज ‘ चकीत करणारी आहे. विंडोज ऑपरेटींग सिस्टम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, क्लाउड सर्व्हिसेस, गेमिंग सर्व्हिस मधे असंख्य ॲप्स, ऑपरेटींग सिस्टम्स व सतत प्रगत, अद्ययावत होणा-या सर्व्हिसेस आहेत.
कंपनी म्हणजे पैशाचे काम.गुंतवणूक, भांडवल पाहिजे या समजूतीला छेद देत जगभरात बौद्धिक गुंतवणूक जास्त व पैशांची कमी अशा एका खोलीत, गॅरेज मधे, आऊट हाऊस मधे थाटलेल्या कंपन्या आज जगावर राज्य करित आहेत. हा मानवाच्या प्रगत उत्क्रांतीचा पुरावाच म्हणला पाहिजे.
4 एप्रिल 1975 ला बिल गेट्स व पाॅल ॲलन यांनी अलबुकर्क, न्यू मेक्सिको, अमेरिका येथे मायक्रोसॉफ्ट स्थापन केली. आज सर्वात जास्त मार्केट व्हॅल्यू – किंमत असलेला ब्रॅन्ड आहे. भारतीय वंशाचे सत्या नाडेला अध्यक्ष तर ब्रॅड स्मिथ हे उपाध्यक्ष आहेत. खुद्द बिल गेट्स तांत्रिक सल्लागार आहेत. मायक्रोसॉफ्ट चे सर्व आकडे चकित करणारे आहेत.
मायक्रोसॉफ्टचा 2024 मधिल महसूल 245.1 अब्ज अमेरिकन डाॅलर्स आहे. एकूण मालमत्ता 512.1 अब्ज डॉलर्स तर कर्मचा-यांची संख्या 2 लाख 28000 आहे. आणि विभाग- मायक्रोसॉफ्ट इंजिनिअरिंग ग्रुप्स, मायक्रोसॉफ्ट डिजीटल क्राईम युनीट, मायक्रोसॉफ्ट प्रेस, मायक्रोसॉफ्ट गेमिंग, मायक्रोसॉफ्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत तसेच उपकंपन्या मायक्रोसॉफ्ट जपान, मायक्रोसॉफ्ट इंडीया, ( भारतात मायक्रोसॉफ्ट कंपनीची ऑपरेशन्स 1990 मधे सुरू झाली ) मायक्रोसॉफ्ट इजिप्त आहेत. या शिवाय लिंकडइन,न्युअन्स कम्युनिकेशन, ( जे भाषण ओळखणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअरचे मार्केटिंग करते. ) रिस्क आयक्यू (मायक्रोसॉफ्टने सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल परिवर्तन व हायब्रिड कामासाठी RiskIQ हे अधिग्रहण केले आहे ) स्काइप, झेंडर ( शेअरिग ॲप) आहेतच. कंपनीची अधिकृत वेबसाईट- microsoft.com.अशी आहे.
. ‘विंडोज’ ही जगातील सर्वात निर्विवाद, प्रसिद्ध व लोकप्रिय ऑपरेटींग सिस्टम आहे. याशिवाय एमएस ( मायक्रोसॉफ्ट) वर्ड्स, एमएस एक्सेल, पाॅवर पाॅइंट, आऊटलूक या सर्व्हिसेस सह एमएस 365, Azure -ॲझ्युअर क्लाउड सर्व्हिसेस, Xbox एक्सबाॅक्स गेमिंग, Surface सरफेस हार्डवेअर, इंटरनेट सर्च इंजिन – बिंग Bing हे देखिल लोकप्रिय आहेत. याशिवाय एमएस टीम, वन ड्राइव्ह – One Drive आहेतच.
मायक्रोसॉफ्ट संशोधनात सतत अग्रेसर आहे. यातील लेटेस्ट म्हणजे मायक्रोसॉफ्टचाआगामी अफाट शक्तीचा क्वांटम काॅम्प्युटर- Quantum Computer ! यात द्रव, वायू, घन अवस्था पलीकडील चवथ्या अवस्थेतील द्रव्याचा उपयोग होत आहे.
मायक्रोसॉफ्टच्या भारतातील सर्व्हिसेस भारतीय भाषांमधे उपलब्ध आहेत. मराठीत एमएस ऑफिस देखिल काम करते. सरकारी कामकाज, भारतीय उद्योगविश्व व नवीन स्टार्टअप्स् ना याची भरघोस मदत होते. महाराष्ट्राच्या ‘डिजीटल गव्हर्नन्स’ मधेही मायक्रोसॉफ्ट व बिल गेट्स फाउंडेशन कडून चांगलीच मदत होते आहे.



