खाडीखालून मेट्रो मार्गिका जाणार

0
217
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

बदलापूर ते कांजुर मार्ग दरम्यान प्रस्तावित असलेल्या मेट्रो-१४च्या मार्गिकेत पूर्व द्रुतगती मार्गावर कांजुर येथे भूमिगत स्थानक उभारले जाणार आहे. त्यासाठी मेट्रो मार्गिका ठाण्याच्या खाडीखालून कांजुरला पोहोचणार आहे. अशा प्रकारे खाडीखालून प्रवास करणारी ही देशातील पहिलीच मेट्रो मार्गिका असेल.

कल्याणच्या पुढे कर्जत-कसारा मार्गावर राहणाऱ्या नोकरदारांना मध्य रेल्वेची लोकलसेवा हा एकमेव पर्याय आहे. अतिवृष्टीत या मार्गावरील वाहतूक अनेकदा ठप्प होते. तांत्रिक बिघाडावेळीही नोकरदारांचे प्रवासात हाल होतात. या सर्व पार्श्वभूमीवर बदलापूर ते कांजूर या ४३ किमी सर्वाधिक लांबीच्या मेट्रो मार्गिकेची आखणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) करण्यात येत आहे.

मेट्रो-१४ बदलापूर-घणसोलीदरम्यान उन्नत असेल. घणसोलीला ती ट्रान्सहार्बर मार्गिकला संलग्न असेल. त्यानंतर खाडी प्रदेश असल्याने ही मार्गिका खाडीखालून भूमिगत मार्गाने जाईल. यादरम्यान कांजुरला मेट्रो स्थानकाची उभारणी केली जाईल. ही मार्गिका तळोजा औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत भागांना जोडणारी असेल. या वसाहतीसह कायम वाहतूक कोंडीत असलेला शिळफाटा, काटई नाका व महापे यासारख्या भागांना देखील जलद वाहतुकीच्या मेट्रोने जोडली जाईल.

वैशिष्ट्ये

एकूण लांबी : ४३.६९ किमी
एकूण स्थानके: २४
दुरूस्ती डेपो: बदलापूर (२१.७ हेक्टर)
बांधकाम कालावधी : ६ वर्षे
एकूण जमिनीची गरज : ५२.१५ हेक्टर (४.१० हेक्टर तात्पुरती)
अपेक्षित खर्च : १८ हजार कोटी रु.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here