प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत असून, उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. किनारपट्टी भागात तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबई, पालघर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबई हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरातील काही भागात तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल राम मंदिर परिसरात 42.5 अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली होती.
मुंबईत सरासरी तापमानापेक्षा तब्बल 6.4 अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नये, तसेच बाहेर पडताना पुरेसे पाणी पिणे आणि डोक्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे आवाहन मुंबई हवामान केंद्राने केले आहे.
या तीन जिल्ह्यांसह रायगड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील अकोला जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तेथेही येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 10 आणि 11 मार्च रोजी या भागात बहुतांश ठिकाणी उष्ण आणि आर्द्र हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शुष्क वाऱ्यांमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.
आज विविध जिल्ह्यांतील तापमानातही वाढ नोंदवली गेली. छत्रपती संभाजीनगर येथे 37.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. बीडमध्ये 38.3 अंश, जळगावमध्ये 39.6 अंश, धाराशिवमध्ये 38 अंश, उदगीरमध्ये 36.6 अंश तर सोलापूरमध्ये 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मुंबईतील कुलाबा येथे 35.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सांताक्रूझ येथे तापमान 38.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. याशिवाय रत्नागिरीमध्ये 34.6 अंश, सांगलीमध्ये 38.2 अंश आणि साताऱ्यात 37.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.






