पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक कष्ट,जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला तर आपण आयुष्यात उत्तुंग यश प्राप्त करू शकू असा विश्वास मंत्रालयात नगरविकास खात्यामध्ये मंत्रालय लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या रोहिणी कुलकर्णी आणि महसूल सहाय्यक दिग्विजय देसाई यांनी व्यक्य केला. ते पन्हाळा तालुक्यातील माले येथे इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंताच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
पन्हाळा तालुक्यातील माले गावातील इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंताचा आणि विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार सोहळा आजी-माजी सैनिक संघटना आणि माले स्पोर्ट्स, माले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या समारंभा कारिता स्पर्धा परीक्षेत यश मिळवणारे मुंबई येथे मंत्रालयात नगरविकास खात्यामध्ये मंत्रालय लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या रोहिणी कुलकर्णी आणि महसूल सहाय्यक दिग्विजय देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी रोहिणी कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले असेल तर जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला तर आपण आयुष्यात उत्तुंग यश प्राप्त करू शकू असा विश्वास रोहिणी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महसूल सहाय्यक दिग्विजय देसाई म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक कष्ट, अभ्यास आणि परिश्रम करून यशाला गवसणी घालता येत असल्याचे सांगितले. यावेळी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंताचा आणि विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, बॅग, रोख रक्कम आणि रोप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच उत्तम पाटील, आजी- माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाजीराव कोडोलकर, प्रकाश पाटील,खंडेराव हिरवे, राजाराम पाटील,संजय जमदाडे, पतंग चौगुले, भीमराव पाटील, आजी – माजी सैनिक संघटना आणि माले स्पोर्ट्सचे पदाधिकारी,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.



